मुंबई : यू. एस. कृषी विभाग आणि महाराष्ट्र कृषी विभागाच्या दरम्यान कृषी सहकार्यासंबंधात सामंजस्य करार करण्यात आला. यू. एस.चे कौन्सुल जनरल डेव्हिड जे. रँझ आणि महाराष्ट्र सरकारचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी बुधवारी मंत्रालयात या निवेदनावर संयुक्तपणे स्वाक्षरी केली व या सामंजस्य कराराला पाठिंबा दर्शविला. यावेळी राज्य सरकारचे कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे यू. एस. आणि महाराष्ट्र कृषी विभागाच्या शेती बाजाराच्या माहिती प्रणालीच्या विकासासाठी आणि इतर क्षेत्रातील संभाव्य तांत्रिक सहकार्यासाठी एक आधार प्राप्त होईल. या कराराच्या माध्यमातून यू. एस. कृषी विभाग मूल्य साखळी वाढवून, कृषी व्यवसाय गुंतवणूक सुलभ करून आणि त्यांच्यामार्फत कृषी उत्पादन प्रणाली विकसित करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधार मिळू शकणार आहे.
यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी निश्चित बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी विकेल ते पिकेल ही मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक बँकेच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविला जात आहे. ३०० दशलक्ष डॉलर्सचा हा स्मार्ट प्रकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांवर भर देऊन सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक कृषी-व्यवसायाच्या विकासास समर्थन देणारा आहे. स्मार्ट प्रोजेक्टचा एक भाग म्हणून, यू.एस.डी.ए.च्या मदतीने कृषी विभाग कृषी आकडेवारी, कृषी विपणन, बाजार बुद्धिमत्ता, कमोडिटी स्टुअर्डशिप कौन्सिलचे आयोजन केले जाईल.
यावेळी यू.एस.चे कौन्सुल जनरल डेव्हिड जे. रँझ म्हणालेल यू.एस.डी.ए. आणि भारत सरकारमधील हा आजपर्यंतचा सर्वांत महत्त्वाकांक्षी करार आहे. महाराष्ट्र हे कृषी ऊर्जेच घर आहे. जागतिक अन्न सुरक्षा, तसेच फायबर आणि इंधनाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका निभावतो. या करारामुळे कृषी उत्पादन प्रणाली अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ होऊन शेतकऱ्यांचे कल्याण होऊ शकेल.
या कार्यक्रमास कृषी आयुक्त धीरज कुमार, एफ.ए.एस.चे लाजारो संडोवळ, कृषी सचिव सुशील खोडवेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तंभले, श्रीकांत अंडगे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.