हिंसाचारासाठी ३६ बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 07:23 AM2021-11-18T07:23:20+5:302021-11-18T07:23:58+5:30
अमरावतीत घडलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी येथे संचारबंदी तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणांत बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सायबर विभागाच्या चौकशीतून समोर येत आहे. आतापर्यंत ३६ बनावट सोशल मीडिया अकाउंट समोर आली असून, त्यानुसार सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अमरावतीत घडलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी येथे संचारबंदी तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. नाशिक पोलिसांनी मालेगाव हिंसाचारप्रकरणी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच नाशिक, नांदेड आणि अमरावती पोलिसांनी हिंसाचारासंबंधी आपला एक स्वतंत्र अहवाल तयार करून राज्य पोलीस मुख्यालय आणि गृहमंत्रालयाला पाठविला आहे.
या खात्यांद्वारे त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराबद्दलचे फेक मेसेज तयार करून व्हायरल करण्यात आले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरल्याची माहिती समोर आली आहे.