Join us

उद्यापासून करा पर्यायी रस्ते आणि पुलाचा वापर; वाहतूक पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:04 PM

लोअर परळ स्थानकासमोरील उड्डाण पुल उद्यापासून दुरुस्तीसाठी बंद असणार

मुंबई - अंधेरी दुर्घटनेनंतरच्या जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने काही पुलांची पाहणी केली असून या पाहणीत रेल्वे रूळांवरून गेलेल्या लोअर परळसह एकूण सहा उड्डाणपुलांची तातडीने पुनर्बाधणी किंवा दुरुस्तीची गरज आहे, असा निष्कर्ष काढला आहे. त्यापैकी लोअर परळ स्थानकासमोरील ना. म. जोशी मार्ग पुलाच्या दुरुस्तीसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असून उद्यापासून या पुलाशी जोडलेले रस्ते आणि उड्डाण पूल उद्या सकाळी ६ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी हा पूल बंद केल्यानंतर या पुलाशी जोडलेला महादेव पालव मार्ग म्हणजेच करी रोड रेल्वे स्थानकासमोरील पुल लालबागच्या दिशेने आणि ना. म. जोशी मार्ग हा चिंचपोकळीच्या दिशेने सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

तसेच फिनिक्स मॉल आणि कमला मिल कंपाऊंडसमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल प्रभादेवी रेल्वे स्थानकापासून गणपतराव कदम मार्गे वरळी नाका हा मार्ग सुरूच असेल अशी माहिती दुधे यांनी दिली. करी रोड सिग्नलपासून ते वडाचा नाका (दीपक सिनेमाकडे जाणार मार्ग) आणि वरळीच्या दिशेने जाणार जोड पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद असणार आहे. दरम्यान या पुलाच्या खालूनच रेल्वे लोकल जाते. लोअर परळ पुलाखाली असलेल्या भाजी मार्केटमधून पर्यायी मार्ग सुरु करण्यात येईल. तसेच लोअर परळ रेल्वे स्थानकात करी रोडहून जाण्यासाठी ना. म. जोशी पुलाखाली डाव्या बाजूला नव्याने सुरु केलेल्या पुलाचा वापर करू शकतात असे ते पुढे म्हणाले.

  

दाटीवाटीचा कॉर्पोरेट परिसर 

लोअर परळ परिसरात अनेक उद्योग- धंदे असून कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. त्यामुळे रोजगारासाठी प्रवाश्यांचे लोंढे सकाळी ९ ते १० च्या सुमारास आणि सायंकाळी ५ ते ७ दरम्यान करी रोड आणि लोअर परळ रेल्वे स्थानकात पाहायला मिळतो. करी रोड, लोअर परळ रेल्वे स्थानकातून वरळी, फिनिक्स मॉल, कमला मिल कंपाऊंड, उर्मी इंडस्ट्रियल इस्टेट, पेनिन्सुला, फुचरेक्स मॅरेथॉन येथे काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर येतो. त्यामुळे या पुलाच्या कामामुळे त्यांची गैरसोय होणार आहे. तसेच चारचाकी, दुचाकीने प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करणं सोयीचं ठरेल.

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीसमहाराष्ट्र