Join us  

स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग फसला

By admin | Published: December 03, 2015 2:22 AM

लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजा बसविण्याची मंजुरी देण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी खासदारांना

मुंबई : लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजा बसविण्याची मंजुरी देण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी खासदारांना दिले होते. मात्र हा प्रयोग अयशस्वी झाल्याची माहिती रेल्वेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेवर करण्यात आलेला हा प्रयोग फसल्यानंतर आता स्वयंचलित दरवाजा बसविण्यासंदर्भात दुसरा प्रयोग केला जाणार आहे. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून सर्वाधिक अपघात होत असल्याने ते रोखण्यासाठी म्हणून स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर हा प्रयोग करण्यास सुरुवात करण्यात आली. एका लोकलमधील प्रथम श्रेणीच्या एका महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवून त्याची चाचणी महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये केली. त्यानंतर पश्चिम रेल्वेवर ही लोकल मार्च महिन्यात चालविण्यात आली. मात्र काही महिने प्रयोग केल्यानंतर तांत्रिक समस्या येऊ लागल्या. लोकलचा दरवाजा काही वेळेला बंदच होत नसल्याचे निदर्शनास आले आणि अनेक अडचणींमुळे स्वयंचलित दरवाजाची सुविधा पश्चिम रेल्वेवर अखेर बंद करण्यात आली. याबाबत रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला विचारले असता, स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी हा प्रयोग असला तरी तो होणे अशक्य आहे. रेल्वेमंत्र्यांनी अपघात रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीचा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावयाचा असून त्यात पश्चिम, मध्य रेल्वेसह राज्य शासनाचे प्रतिनिधी आणि प्रवासी संघटना आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करून आणि अनेक तांत्रिक बाजूंचा विचार करूनच पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. स्वयंचलित दरवाजा लोकलचा प्रयोग कसा होता?लोकलचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद होण्यासाठी साधारणपणे पाच सेकंद लागतात. ही ट्रेन तेरा सेकंदांसाठी स्थानकांवर थांबेल. सध्या लोकलचा स्थानकांवरील थांबा अठरा ते वीस सेकंदांचा असून त्याच्या वेळेतच स्वयंचलित दरवाजाच्या लोकलची प्रक्रिया बसविण्यात आली होती. पश्चिम रेल्वेवर स्वयंचलित दरवाजा लोकलचा प्रयोग झाल्यानंतर मध्य रेल्वेकडूनही हा प्रयोग केला जाणार होता. मात्र प्रयोगच फसल्याने मध्य रेल्वेने त्यावर चिडिचूप राहणेच पसंत केले. प.रे.कडून १५ डब्यांत जागा वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी डब्यातील रचनेत काही बदल केला जातो का याची चाचपणी केली जात आहे. 82लोकलच्या १,३00 फेऱ्या पश्चिम रेल्वेवर होतात. तर मध्य रेल्वेवर १२१ लोकलच्या १,६00 फेऱ्या होतात. एकूणच स्वयंचलित दरवाजा लोकलचा खर्च पाहिल्यास तो साधारण एक हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे अधिकारी सांगतात. तसेच जास्तीत जास्त स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकल बसविल्यास लोकल फेऱ्यांवरही त्याचा परिणाम होऊन फेऱ्या कमी होऊ शकतात. पश्चिम रेल्वेवर एका लोकलच्या एका डब्याला स्वयंचलित दरवाजा असलेली सुविधा बंद केलेली आहे. आता स्वयंचलित दरवाजा बसविण्यासाठी दुसरा प्रयोग करण्याचा विचार करत आहोत. डब्यात प्रवाशांना खेळती हवा कशी ठेवता येईल. तसेच डब्यातील प्रवासी क्षमता कमी होईल का आणि गर्दी तर होणार नाही ना यासह अनेक बाबींचा विचारही करत आहोत.- शैलेंद्र कुमार, पश्चिम रेल्वे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक