पंकज पाटील, अंबरनाथनिवडणूक ही कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, या जिद्दीला पेटलेल्या अंबरनाथ-बदलापुरातील बड्या राजकारण्यांनी आपल्या सुरक्षेसाठी आणि प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॉन्सरचा (सुरक्षारक्षक) आधार घेतला होता. या निवडणुकीवर विकासाच्या मुद्यापेक्षा दादागिरीचा प्रभाव जास्त दिसत होता. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. प्रभागातील मतदार याद्यांचा असलेला घोळ आणि बोगस मतदारांचा आकडा सर्वाधिक असल्याने उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेवारावर वचक बसविण्यासाठी दादागिरीचा आधार घेतला. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एकत्रित करून प्रभागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या दिवशी केला आहे. दुसऱ्यावर दहशत निर्माण करीत असताना स्वत:च्या सुरक्षेसाठीही या उमेदवारांनी चोख व्यवस्था केली होती. खाजगी सुरक्षारक्षक (बॉन्सर) यांना भार्इंदर, ठाणे, कल्याण, मुंबई येथून बोलविण्यात आले होते. उमेदवाराच्या मागेमागे फिरण्याचे काम हे बॉन्सर करीत होते. प्रत्येक उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी हे बॉन्सर घेऊन फिरत असल्याने प्रभागांमध्ये उमेदवार समोरासमोर आल्यावर तणाव निर्माण होत होता. शिवसेनेने बॉन्सरशिवाय अंबरनाथ, बदलापुरातून अनेक शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना प्रभागात फिरण्यासाठी आणि उमेदवारामागे गर्दी वाढविण्यासाठी बोलविले होते.
दादागिरीसाठी बॉॅन्सरचा वापर
By admin | Published: April 22, 2015 11:55 PM