'पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनचा वापर घातकच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 02:49 AM2019-12-29T02:49:48+5:302019-12-29T02:49:51+5:30
- श्रीकिशन काळे पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ. प्रमोद मोघे यांनी नागरिकांना ...
- श्रीकिशन काळे
पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ. प्रमोद मोघे यांनी नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी विविध सोप्या आणि स्वस्त उपायांची माहिती देण्याचे काम सुरू केले. १७ वर्षांपासून ते हे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांना नुकतेच आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्रातर्फे कै. बी. जी. देशमुख जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
आतापर्यंत केलेल्या कामाविषयी काय सांगाल?
एनसीएलमधून १७ वर्षांपूर्वी निवृत्त झालो. एनसीएलमध्ये असताना पाण्यावर संशोधन केले होते. त्यासाठी सुमारे ४० पेटंट मी घेतली. त्यातील १० पेटंट पाण्यावर आहेत.
पाण्यातील क्लोरिनला विरोध कशासाठी?
पुणेकरांना खडकवासला धरणातून पिण्याचे पाणी शुद्ध करून दिले जाते. क्लोरिनचा वापर करून त्यावर कोट्यवधी खर्च होत आहेत. पिण्याचे पाणी माणशी ३ लिटर लागते. समजा ३५ लाख वस्ती असलेल्या पुण्याला जास्तीत जास्त १०५ लाख लिटर शुद्ध पिण्याचे पाणी आवश्यक आहे; पण त्यासाठी ४५० दशलक्ष लिटर पाण्याचे क्लोरिनने शुद्धीकरण गरजेचे आहे का? हे पाणी अंघोळ, धुणीभांडी, कपडे अशा अनेक कामांसाठी वापरले जाते. हा खर्च अनावश्यक आहे. पिण्यासाठी वेगळे बाटलीबंद पाणी दिल्यास कोट्यवधी रुपये वाचू शकतील.
क्लोरिनमुळे शरीरावर काय परिणाम होतो?
पाण्याशी क्लोरिनचा संपर्क येतो, त्याचवेळी पाण्यातील सेंद्रिय, असेंद्रिय पदार्थांशी संयोग होऊन क्लोरिनमुळे घातक पदार्थांची निर्मिती होते. क्लोरिनच्या अधिक प्रमाणामुळे कर्करोग होतो. या पाण्याने केस, कातडी, श्वसनरोग, स्त्रियांचे गर्भाशय, थायरॉईड यावर परिणाम होतो.
भविष्यातील योजना काय?
अनेक वर्षांपासून मी मराठवाडा, कोकणात शेतकऱ्यांसाठी काम करतोय. त्यांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करतोय. घरगुती उपाय करून पाणी शुद्ध कसे करावे, याची माहिती त्यांना दिली जाते. आतापर्यंत ४ लाख लोकांपर्यंत ही माहिती गेली आहे.
मग पाणी शुद्ध कसे करायचे?
प्रथम पाणी उकळून घ्यायला हवे, तसेच घरात लाकडाची, कोळशाची राख असेल, तर ती त्यात टाकल्यास गाळ तळात जातो
आणि पाणी शुद्ध होते. शहरात शेवग्याचे बी मिळते. एक लिटर पाण्यात १ शेवग्याचे बी पावडर टाकायची असते. ते पाण्यात
टाकून ठेवल्यास दोन तासांत पाणी शुद्ध होते. ते आपण पिऊ शकतो. सूर्यप्रकाशात जरी तीन तास पाणी ठेवले, तरी त्यातील घातक
जिवाणू मरून जातात. तांब्याच्या भांड्यातही पाणी ठेवून शुद्ध करता येते. आवळा पावडर मिळते, त्याने पाणी निर्जंतुक होते. अंजन, खस (वाळा), नागरमोथा, तुळस, नीम, निरमळी, वाळू यांचा वापर करूनही पाणी पिण्यायोग्य करता येते.
क्षारयुक्त पाणी...
पाण्यातील हार्डनेस काढायचा असेल, तर ज्येष्ठ मध पावडर,
वाळा पावडरचा वापर करता येतो. त्याने पाणी मृदू होते. गोवºयाची राख, नारळाच्या शेंड्यांची राख, जलपर्णीची राख पाणी शुद्ध करते. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी हे उपाय आत्मसात करण्याची गरज आहे.