आणखी डोसची केंद्राकडे मागणी
मुंबईत कोव्हॅक्सिन लसीचा वापर वाढला
आणखी डोसची केंद्राकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मागील चार दिवसांत कोव्हॅक्सिन लसीचा वापर २५८ टक्क्यांनी वाढला असून, आता खासगी रुग्णालयातही पालिकेने या लसीचे डोस पुरविणे सुरू केले आहे. परिणामी, कोव्हॅक्सिनचे आणखी डोस पुरविण्याची मागणी हैदराबाद येथील भारत बायोटेककडे केली आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, १८ मार्चपर्यंत १६ हजार १०६ लसीचे डोस वापरण्यात आले. मात्र, लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन २२ मार्च रोजी तब्बल ५७ हजार ६७९ व्यक्तींनी लस घेतली. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर मागील आठवड्याभरात कोव्हॅक्सिन लसीचा वापर वाढल्याचे दिसून आले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ४५ दिवसांत ४५ लाख लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. कोव्हॅक्सिनचे १० लाख डोस उपलब्ध असून, येत्या आठवड्यात आणखी तीन लाख लसींचे डोस उपलब्ध होतील.
लसीकरण मोहिमेच्या विस्तारात लीलावती, नानावती, बॉम्बे रुग्णालयांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस पुरविण्यात येणार आहेत. यानंतर आता केंद्राने पालिकेला सेव्हन हिल्स रुग्णालय, वांद्रे कुर्ला कोविड केंद्र, नेस्को आणि मुलुंडमध्ये कोव्हॅक्सिन लस पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वी केवळ जे. जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती.