मुंबई :रेल्वेचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य प्रवाशांसाठी सुखकर व्हावा, यासाठी उच्च न्यायालयाने मध्य व पश्चिम रेल्वेला गर्दी व्यवस्थापन तंत्र वापरण्याची सूचना केली.गर्दीवर उपाय काढण्यासाठी सर्व बोगींमध्ये केवळ उभी राहण्याचीच सोय उपलब्ध करण्याबाबत विचार करा, अशी सूचना न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने केली. गर्दीच्या वेळात ज्येष्ठ नागरिकांना लोकलमध्ये चढण्यासही मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बोगी ठेवण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक ए.बी. ठक्कर यांनी जनहित याचिकेद्वारे खंडपीठापुढे केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने वरील सूचना मध्य व पश्चिम रेल्वेला दिल्या. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पिक-अवर आणि अन्य वेळांत प्रवासी कोणत्या ठिकाणी जास्त येतात किंवा जातात, याचा अभ्यास करण्याची जबाबदारी खासगी संस्थेवर सोपवा, असेही खंडपीठाने म्हटले. आतापर्यंत लोकलमधून ३८ हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करत आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी ‘महिला विशेष’ लोकलमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्याची मुभा द्या, अशीही सूचना खंडपीठाने रेल्वेला केली. या सूचनांवर रेल्वे प्रशासनाला उत्तर देता यावे, यासाठी खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
गर्दी व्यवस्थापन तंत्र वापरा
By admin | Published: October 17, 2015 2:19 AM