मुंबई : माहिम येथील सुमारे साडेतीनशे वर्षे जुन्या मशिदीमध्ये कालानुरूप बदल करत, वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. सरकारच्या गो ग्रीन या संदेशाचे पालन करत हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले.माहिम जुमा मशीद ट्रस्टतर्फे संचलित करण्यात येणाऱ्या या मशिदीमध्ये पहिल्या टप्प्यात १५ किलो वॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे, तर दुस-या टप्प्यात १० किलो वॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्या या मशिदीला विजेच्या वापराबाबत दरमहा ५० ते ६० हजार रुपये वीजदेयक भरावे लागते, तर रमजानमध्ये विजेच्या वापरात वाढ होत असल्याने, वीजदेयक सुमारे दुप्पट होऊन एक लाख ते सव्वा लाख रुपये वीजदेयक भरावे लागते. सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती होणार असल्याने, वीज वापरामध्ये व वीजदेयकामध्ये किमान ५० टक्के फरक पडेल व कमी वीजदेयक येईल, अशी माहिती मशीद ट्रस्टचे विश्वस्त फहद पठाण यांनी दिली.सरकारतर्फे सातत्याने सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन केले जात असल्याने, सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, सौरऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मशीद ट्रस्टचे विश्वस्त हबीब फकीह यांनी दिली. विविध प्रदूषणामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने, सौरऊर्जेचा जास्तीतजास्त वापर केल्याने प्रदूषणामध्येदेखील घट होईल, असा विश्वास फकीह यांनी व्यक्त केला. मुस्लीम समाजातील मोठ्या शिक्षणसंस्था, मोठ्या मशिदी व मोठ्या दर्गाह प्रशासनांनी याची दखल घेत, आपापल्या संस्थांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढविण्याची गरज असून, त्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती फकीह यांनी दिली.१५ लाखांचा खर्चमाहिम मशिदीतील प्रकल्प उभारण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने, मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊन विजेच्या वापरावरील खर्च वाचेल व पर्यायाने विजेची बचत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सौरऊर्जेच्या माध्यमातून माहिम येथील मशिदीत विजेचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 3:14 AM