एमकृषी फिशरीज अॅप वापरा आणि सुरक्षित राहा, लवकरच येणार नवे फिचर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:46 AM2019-02-07T03:46:26+5:302019-02-07T03:47:10+5:30
वर्सोव्यातील केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्थेने मच्छीमारांसाठी उपयुक्त ‘एमकृषी’ फिशरीज हे मोबाइल अॅप तयार केला आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : वर्सोव्यातील केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्थेने मच्छीमारांसाठी उपयुक्त ‘एमकृषी’ फिशरीज हे मोबाइल अॅप तयार केला आहे. या अॅपद्वारे समुद्रातील हालचालींकडे लक्ष ठेवता येते़ त्यामुळे मच्छीमार बांधवांचे जीव वाचण्यास मदत मिळेल. या अॅपमध्ये नवे फिचरही लवकरच येणार आहे़ अॅप आता अधिक अद्यावत होणार आहे.
अॅपमध्ये ‘न्यूज टिकर’ हे नवे फिचर येणार आहे. न्यूज टिकरमध्ये समुद्रातील वादळ, हवामानाची माहिती एका ओळीत उपलब्ध होईल. सागरी शास्त्रज्ञ देखील मायक्रो ब्लॉगिंग साईडचा वापर करत आहेत. मायक्रो ब्लॉगिंग साईडच्या मदतीने मच्छीमारांच्या संदर्भातील माहिती थोडक्यात उपलब्ध होते. शासनाच्या नव्यानव्या योजनांची माहिती अॅपद्वारे मिळणार आहे. मच्छीमार बांधवांच्या प्रतिक्रियांचाही अॅपमध्ये समावेश केला जाणार आहे. मच्छीमारांनी शाश्वस्त मासेमारी आणि मासे हाताळण्याची पद्धत त्याबद्दलची माहिती अॅपमध्ये दिली जाईल, असे टीसीएस एमकृषी फिशरीज गट प्रमुख दिनेश कुमार सिंग यांनी सांगितले.
मच्छीमारांच्या व्यवसायाची आणि जागृकतेची माहिती या अॅपमध्ये टाकण्यात येणार आहे. हा अॅप एॅडव्हान्स मोबाइलसाठी तयार करण्यात आला होता. परंतु काही मच्छीमार एॅडव्हान्स मोबाइल वापर नसल्याने या अॅपचा वापर कमी प्रमाणात झाला. आता सर्व माहिती मोबाइलमध्ये एसएमएसद्वारे घेता येईल अशी व्यवस्था अॅपमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती मात्स्यिकी पर्यावरण प्रबंधन विभागाचे पूर्व मुख्य शास्त्रज्ञ व्ही. व्ही. सिंग यांनी दिली.
काय करायचं?
अॅपमध्ये जर वारा आणि लाटांची उंची हिरव्या, पिवळा, नारंगी, लाल व पांढऱ्या रंगाने दर्शवित असेल तर समुद्रात जाऊ नका.
अॅप लिंक इतरांना सामायिक (शेअर) करा किंवा मच्छीमारांच्या तसेच कौटुंबिकांच्या हँडसेटवर डाउनलोड करा.
प्रतिकूल हवामान तपासण्यासाठी बांधवाना शिक्षित करा, त्यांना आठवण करुन द्या आणि जीवन वाचवा.
एमकृषी या अॅपचा प्रसार मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये झाला आहे. तर याचा जास्त प्रसार हा पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग इत्यादी जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे. संभावित मत्स्य क्षेत्रा(पीएफझेड)ची माहिती, समुद्राच्या हालचालीबद्दलची माहिती (वारा, वादळ, चक्रीवादळ), लाटांची उंची, हवामानाचा अंदाज इत्यादी माहिती अॅपद्वारे मच्छीमारांना उपलब्ध करुन दिली जाते.
- अजय नाखवा, शास्त्रज्ञ, केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्था