प्रसाधनगृह देखभालीसाठी जीओ टॅगिंगचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 03:00 AM2019-01-09T03:00:00+5:302019-01-09T03:00:28+5:30
ठेकेदाराच्या मनमानीला चाप : ६४०२ सीट्सच्या देखभालीसाठी ६ कोटी खर्च
नवी मुंबई : शहरातील प्रसाधनगृहांची देखभाल करण्यासाठी विभागवार ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. शहरातील ६४०२ सीट्सची देखभाल करण्यासाठी वर्षाला ६ कोटी ८९ लाख रुपये खर्च होणार आहेत. सर्व प्रसाधनगृहे २४ तास सुरू ठेवली जाणार असून देखभालीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी जीओ टॅगिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हागणदारीमुक्त नवी मुंबई मोहीम महापालिकेने राबविली आहे. तीन वर्षांपासून शहरातील दुरवस्था झालेल्या प्रसाधनगृहांची दुरुस्ती केली आहे. नवीन प्रसाधनगृहांची उभारणी केली आहे. ई-टॉयलेटसह फिरती शौचालयेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक वर्षी प्रसाधनगृह उभारणी व देखभाल - दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु पालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार व्यवस्थित काम करत नाही. साफसफाई वेळेत केली जात नाही. नागरिकांकडून जादा शुल्क आकारले जाते. सूर्यास्तानंतर प्रसाधनगृहांना टाळे लावले जातात. नागरिकांशी उद्धट वर्तन केले जाते. अनेक ठिकाणी देखभाल करण्यासाठी एकही कर्मचारी उपलब्ध नसतो. या समस्येमुळे महापालिकेचा खर्च व्यर्थ जात होता.
प्रसाधनगृह देखभालीच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी विभागवार ८ ठेकेदारांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. यापुढे सर्व प्रसाधनगृहे २४ तास खुली ठेवावी लागणार आहेत. प्रत्येक दोन तासांनी प्रसाधनगृहांची स्वच्छता करणे आवश्यक असून काम करण्यापूर्वी व केल्यानंतर जीओ टॅगिंग केलेले फोटो काढून आॅनलाइन रिपोर्ट देणे बंधनकारक असणार आहे. यापुढे प्रसाधनगृहाचा वापर करण्यासाठी नागरिकांकडून फक्त २ रुपये, आंघोळीसाठी ३ रुपये शुल्क मंजूर करण्यात आले आहे. मासिक पाससाठी १०० रुपये प्रस्तावित केला होता. परंतु राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांनी मासिक शुल्क आकारू नये अशी सूचना मांडली. शहरातील प्रसाधनगृहांच्या टेरेसवर जुगार सुरू असतो. अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे नगरसेवक सुनील पाटील यांनी निदर्शनास आणले.
प्रसाधनगृह वार्षिक खर्च
विभाग सीट्स खर्च
बेलापूर ९३८ १००७४१२०
नेरुळ ७३९ ७९३६८६०
तुर्भे ९१५ ९८२७१००
वाशी ३१७ ३३८५५६०
कोपरखैरणे ७३९ ७९३६८६०
घणसोली १०९४ ११८१५२००
ऐरोली ७४० ७९९२०००
दिघा ९२० ९९३६०००
प्रसाधनगृह देखभालीच्या कामात समाविष्ट गोष्टी
च्प्रसाधनगृह २४ तास सुरू राहणार
च्दोन तासानंतर स्वच्छता करून जीओ टॅगिंगद्वारे रिपोर्टिंग करणे
च्देखभाल करण्यासाठीच्या कर्मचाऱ्यांना गणवेश बंधनकारक
च्शौचालयाकरिता दिशा दर्शक फलक, संकेतचिन्ह व केअर टेकरची दर्शनी भागात माहिती
च्तक्रारवही ठेवणे व आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित फिडबॅक पोलिंग स्टेशन अद्ययावत करणे