सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शंभर जॅकचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:48 AM2019-05-10T06:48:57+5:302019-05-10T06:49:08+5:30
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होते.
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होते. या कामाला सुमारे पाच महिन्यांचा अवधी लागणार होता, मात्र आता या कामासाठी लागणाऱ्या जॅकचा वापर वाढवण्यात आला असल्याने हे काम कमी कालावधीत पूर्ण होणार असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले.
उपनगरीय प्रवाशांसाठी महत्त्वाचा असलेल्या सायन पुलाची दुरुस्ती एमएसआरडीसीमार्फत करण्यात येणार आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी या उड्डाणपुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करावी लागणार आहे. या पुलाला एकूण १७० बेअरिंग असून ते पूर्णपणे बदलण्यात येतील. यासाठी कंत्राटदाराकडून १२ जॅकचा वापर करण्यात येणार होता. मात्र, यामुळे पुलाचे सर्व बेअरिंग बदलण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला असता. उड्डाणपूल रहदारीचा असल्याचे वाहतूककोंडी झाली असती. ती टाळण्यासाठी कंत्राटदाराला शंभर जॅकचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर जॅकचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र हे जॅक उपलब्ध होईपर्यंत आणखी एक महिन्याचा अवधी लागेल. तोपर्यंत हा पूल हलक्या वाहनांसाठी खुला असेल.
सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. त्यांच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठका पार पडल्या होत्या. बेअरिंग बदलण्यात येणार असल्याने तोपर्यंत खबरदारीची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आल्याचे एमएसआरडीसीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
जून-जुलैमध्ये होणार दुरुस्तीचे काम
सायन पुलाचे काम मे महिन्यात सुरू होणार होते, मात्र आता हे काम जून-जुलैदरम्यान सुरू होणार आहे. बेअरिंग बदलण्याचे काम सुरू झाल्यानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हे काम जलदगतीने करण्यात येणार असून यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागेल. या कालावधीमध्ये सायन उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांना उड्डाणपुलाखालील रस्ता ही पर्यायी व्यवस्था राहणार आहे. या पुलाच्या दुरुस्तीच्या काळात पावसाळा सुरू होणार असल्याने तसेच शहरात सुरू असलेल्या मेट्रो आणि महापालिकेच्या कामांमुळे या भागात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.