दिवाळीत खवा चांगलाच वापरा; एफडीएच्या विक्रेत्यांना सूचना, राज्यभरात विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:55 PM2024-10-24T12:55:41+5:302024-10-24T12:56:11+5:30
दिवाळीत मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा आणि सुक्यामेव्याची मागणी वाढते
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिवाळीनिमित्त विकल्या जाणाऱ्या मिठाईसह इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी विक्रेत्यांनी चांगल्या दर्जाचे साहित्य वापरावे. विशेषत: खव्यासह दूध, दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक योग्य तापमान ठेवून सुरक्षितरीत्या करावी, असे निर्देश एफडीएने राज्यभरातील उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांना दिले आहेत. या काळात भेसळीची शक्यता लक्षात घेऊन मिठाई, फरसाण उत्पादकापासून विक्रेत्यांच्या दुकानांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिवाळीत मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा आणि सुक्यामेव्याची मागणी वाढते. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर तपासणी मोहिमेत भेसळ झाल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा एफडीएने दिला आहे. यासंदर्भात एफडीएच्या कार्यालयात मिठाई, मावा, उत्पादक आणि वितरकांच्या बैठका घेण्यात येत आहेत. यावेळी विक्रेत्यांना ताजी व सकस मिठाई विकण्याबरोबरच विषबाधेसारखा प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
- व्यावसायिकांना सूचना
पदार्थ तयार करणारी जागा स्वच्छ ठेवा.
परवानाधारक, नोंदणीकृत व्यावसायिकाकडून कच्चा माल खरेदी करा.
पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाणी वापरा.
कामगारांची वैद्यकीय तपासणी करा.
मर्यादित खाद्यरंग वापरा.
खाद्यतेल पुन्हा वापरू नका.
बिलावर एफएफएसएआय क्रमांक टाका.
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. ग्राहकांनी खरेदी करताना खरेदी बिल घ्यावे, जेणेकरून फसवणूक होणार नाही. मावा, खवा चांगल्या दर्जाच्या वापरला जात नसल्याचे लक्षात आले, तर एफडीएशी संपर्क साधावा.
- मंगेश माने, सहआयुक्त, बृहन्मुंबई, अन्न व औषध प्रशासन