मृत पक्ष्यांना खड्ड्यात पुरण्यासाठी चुनखडीचा वापर करा
बर्ड फ्ल्यू : मुंबई महापालिकेच्या सूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मृत पक्ष्यांना खड्ड्यात पुरण्यासाठी चुनखडीचा वापर करणे आवश्यक आहे. हा खड्डा भटक्या प्राण्यांमार्फत उकरला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. पोल्ट्रीधारक, सर्वसामान्य जनता यांना स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचा किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात याची माहिती द्यावी. मृत पक्ष्यांना हात लावू नये, शवविच्छेदन करू नये, त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि ठाण्यातील पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेच्या समन्वयाने यासंदर्भात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेच्या हद्दीत पक्ष्यांचे मृत्यू होत असतील, तर १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी. आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपत्कालीन विभाग, संबंधित सहायक आयुक्त कार्यालयातील अथवा वॉर्ड रूममार्फत त्या विभागातील कार्यरत सहायक अभियंता यांना माहिती दिली जाईल. विभाग कार्यालयातील सहायक अभियंत्यांच्या अधिपत्याखाली कर्मचारी, श्रमिक मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावतील. मृत पक्ष्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी सहायक अभियंत्याने शासनाने नेमणूक केलेल्या रॅपिड रिसपॉन्स टीमच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बर्ड फ्लूसंदर्भात अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये, माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
......................................