Join us

दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करा

By admin | Published: March 02, 2016 2:27 AM

मराठी भाषेवर भरभरून प्रेम करावे, तिचा मान राखावा. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असला तरी अभिजात दर्जा मिळणे गरजेचे आहे.

मुंबई : मराठी भाषेवर भरभरून प्रेम करावे, तिचा मान राखावा. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असला तरी अभिजात दर्जा मिळणे गरजेचे आहे. यासाठी दैनंदिन जीवनात मराठीचा कटाक्षाने वापर करावा, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या महापालिका सभागृहात बोलत होत्या.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठी भाषा पंधरवडा-२०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी महापालिका सभागृहात झाला. या वेळी महापौर स्नेहल आंबेकर बोलत होत्या. भाषेविषयी त्या म्हणाल्या की, भाषा आणि संस्कृतीची स्पंदने आपल्या मनात उमटत असतात. मराठी भाषेबरोबरच अन्य भाषा शिकायला हरकत नाही, पण मातृभाषेमध्ये आपण पारंगत व समृद्ध असलेच पाहिजे. महापौर आंबेकर यांनी ‘पंढरपूरची शाळा’ ही कविता सादर केली. ‘मराठी भाषेतील विनोद’ या विषयावर शिरीष कणेकर यांनी विचार मांडले. ते म्हणाले की, इंग्रजी हल्ली सगळ्याच क्षेत्रांत आवश्यक अशी भाषा आहे. शिक्षणातही इंग्रजीला पर्याय नाही, आपण ज्ञान शाखांकरिता शब्दकोश विकसित करू शकलो नाही, असे असले तरी मराठी भाषेबद्दल न्यूनगंड बाळगू नका. या प्रसंगी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)> कुर्ला येथे मराठीचा जागरमातृभाषेचे अध्ययन व्हावे, हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. आजची स्थिती पाहता, मराठी भाषा टिकवणे गरजेचे झाले आहे. हे लक्षात घेऊन, कुर्ला येथील महिला मंडळ बाल विकास केंद्रात मराठी ‘राजभाषा दिन’ साजरा करण्यात आला.ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून, मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांची शब्दसंपत्ती वाढावी, यासाठी पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुग्यात लपलेल्या अक्षरातून शब्दनिर्मिती’ ही स्पर्धा घेण्यात आली. भाषिक खेळाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसोबत ‘वाचू आनंदे’ हा कार्यक्रम रंगला. या वेळी डॉ. अश्विनी करवंदे आणि शिक्षक निरीक्षक विजय जाधव उपस्थित होते.या वेळी ‘फुलोरा’ (इ. दुसरी), ‘मी’ (इ. तिसरी), गड-किल्ले आणि आद्याक्षरे (इ. चौथी) या हस्तलिखितांचे प्रकाशन झाले. लता पोळ, विजय जगदाळे, कृष्णा पांगरे यांनी या हस्तलिखितामागची पार्श्वभूमी सांगितली. कुसुमाग्रजांच्या जीवनावरील चित्रफीतही दाखवण्यात आली.