मुंबई: मराठीच्या मुद्यावरून अॅमेझॉनला जोरदार दणका दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. मनसेच्या मागणीवर पश्चिम रेल्वेकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.मनसेच्या रेल्वे कामगार सेनेकडून पश्चिम रेल्वेकडे मराठी अनिवार्य करण्याबद्दल मागणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रकं, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती प्रसिद्ध केली जात असते. पण यातल्या सर्व पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. केंद्र सरकारनं प्रत्येक राज्यांनुसार तिथली भाषा वापरणं बंधनकारक केलं आहे. पण असं असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याचा आक्षेप मनसेनं नोंदवला आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.
जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करा; अॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे
By कुणाल गवाणकर | Published: December 27, 2020 2:03 PM