Join us

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे प्रमाण झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरीदेखील संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नाक आणि तोंडावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरीदेखील संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नाक आणि तोंडावर मास्क अथवा रुमाल वापरणे बंधनकारक केले आहे. नागरिकांना मास्क वापराबाबत शिस्त लागावी यासाठी महानगरपालिका विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील करत आहे. तरीही अनेक मुंबईकर घराबाहेर पडताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक जणांच्या चेहऱ्यावरचा मास्क हा अक्षरशः नाक आणि तोंडाच्या खाली सरकलेला असतो, तर काहीजण केवळ पोलिसांना व पालिकेच्या क्लिनअप कर्मचाऱ्यांना पाहिल्यावरच कारवाईच्या भीतीपोटी मास्क वापरतात.

मास्कच्या वापराबाबत निम्मे मुंबईकर गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे.

१ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी वेळेच्या बंधनात सुरू करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीत काही प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. हे पाहता शहरातील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कोरोनाचा प्रकोप आता कमी झाला असला तरीदेखील मुंबईत दिवसाला सरासरी ४०० ते ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाल्यास मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळी उद्यानांमध्ये व्यायाम करण्यासाठी येणारे काही नागरिक मास्क वापरण्यास टाळाटाळ करतात, तर बाजार व खरेदीच्या ठिकाणांवर अनेक विक्रेते व दुकानदारदेखील मास्क वापरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये नाक्यावर जमलेल्या निम्म्या तरुणांनी मास्क घातलेला नसतो, तर काहीजण मास्क नाक व तोंडाच्या खाली सरकवून एकमेकांशी बोलत उभे असतात. अनेक वाहनचालकदेखील मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.