Join us  

घातपात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा

By admin | Published: March 11, 2017 1:24 AM

गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या रुळांवर लोखंडी तुकडे आणि स्फोटके टाकून घातपात घडवण्याचे प्रकार उघडकीस आले. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने

मुंबई : गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या रुळांवर लोखंडी तुकडे आणि स्फोटके टाकून घातपात घडवण्याचे प्रकार उघडकीस आले. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने असे घातपात रोखण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना पश्चिम व मध्य रेल्वेला शुक्रवारी केली. ‘दररोज हजारो मुंबईकर लोकलने प्रवास करतात. रेल्वेच्या रुळांवर अशा प्रकारे वस्तू ठेवून दहशतवादी किंवा काही समाजकंटक घातपात घडवण्याचा प्रयत्न करत असावेत. त्यामुळे काही तरी घडण्यापेक्षा वेळीच काळजी घेतलेली बरी,’ असे न्या. व्ही.एम. कानडे व न्या. पी.आर. बोरा यांच्या खंडपीठाने म्हटले.अशा प्रकारे रुळांवर काही ठेवले असेल तर ते समजण्यासाठी अ‍ॅलर्ट देण्याची काही यंत्रणा उपलब्ध आहे का? नसेल तर तशी विकसित करण्याचा विचार करा, अशी सूचनाही खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला केली.काही दिवसांपूर्वी दिवा व नवी मुंबईच्या एका स्थानकासह राज्यातील अन्य स्थानकांजवळील रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू व जिलेटीन ठेवून घातपात घडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. ‘एवढ्या रुळांवर गँगमननी लक्ष ठेवणे शक्य नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र सध्या तरी गँगमनची संख्या वाढवा आणि त्यांना गस्त घालायला सांगा. त्यांना मदत करण्यासाठी आरपीएफ आणि होमगार्डचीही नियुक्ती करा,’ अशीही सूचना खंडपीठाने पश्चिम व मध्य रेल्वेला केली. खंडपीठाने संरक्षक भिंत नसलेल्या ठिकाणी ती बांधण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही मध्य व पश्चिम रेल्वेला दिले. तसेच प्रत्येक स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्षही उपलब्ध करण्याची सूचना केली. (प्रतिनिधी) झवेरी यांची याचिकासामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने वरील सूचना मध्य व पश्चिम रेल्वेला केल्या.