माऊथवॉशचा वापर करा; कोरोनाचा संसर्ग टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:19 AM2020-06-10T03:19:28+5:302020-06-10T03:19:51+5:30
कोरोनाबाधित व्यक्तीची थुंकी, शिंकणे तसेच तोंडातील लाळेतून या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका असतो.
नवी दिल्ली : लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधिक सजग रहावे लागणार आहे. अशा वेळी कोरोना विषाणूपासून बचाव करावयाचा असेल तर माऊथवॉश परिणामकारक ठरू शकतो, असे संशोधनातून पुढे आले आहे. कोरियातील संशोधकांनी असा दावा केला आहे. हे संशोधन जर्नल आॅफ मेडिकल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीची थुंकी, शिंकणे तसेच तोंडातील लाळेतून या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका असतो. अशा स्थितीत विषाणूपासून आपल्या बचावासाठी माऊथवॉशचा वापर प्रभावी ठरू शकतो. क्लोरहेक्सिडिन माऊथवॉशमुळे तोंडाच्या लाळेतील विषाणूंचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. माऊथवॉशने गुळण्या केल्यास लाळेतील विषाणूंचे प्रमाण दोन तासांसाठी कमी होत असल्याने विषाणूच्या प्रसाराचा धोका कमी होतो. त्यामुळे होम क्वारंटाइन असलेली व्यक्ती, बाहेरून येणारी व्यक्ती तसेच रुग्णांनी दर १ ते २ तासांनी माऊथवॉशने तोंड स्वच्छ करावे तसेच डेंटिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट आणि फिजिसियन्स यांनीही येणाऱ्या रुग्णांना माऊथवॉशने गुळण्या करून येण्याचा सल्ला द्यावा जेणेकरून आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना संसर्गाचा धोका उद्भवू शकत नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.