लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात लिपिकपदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीने उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट आदेशपत्रासह सामाजिक न्याय विभागाच्या बनावट ई-मेल आयडीचा वापर केल्याचे उघड झाले आहे. याबाबत गोवंडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
गोवंडी पोलिसांनी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी माळवे पोलिस कोठडीत असून, काही जणांकडे चौकशी सुरू आहे. मोहिते हा धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून कामाला असल्याचे सांगत होता. यामध्ये कुठल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्याचा समावेश आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी, गेल्या डिसेंबरअखेरीस, गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने मंत्रालयातील बोगस लिपिक भरती प्रकरणात मंत्रालयात शिपाई पदावर असलेल्या सचिन डोळस याच्यासह महादेव शेदू शिरवाळे, नितीन कुंडलिक साठे, प्रकाश सकपाळेलाही अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सामान्य प्रशासन उपसचिवांच्या केबिनमध्येच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचे समोर आले होते.