Join us  

अंधेरी पोटनिवडणुकीत 'नोटा'साठी नोटांचा वापर, पोलिसांकडे व्हिडिओ क्लीप

By मनोहर कुंभेजकर | Published: November 01, 2022 6:25 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात आयोजित अंधेरी, चकला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी ही मागणी केली

मुंबई - येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात नोटांचा वापर हा नोटा मतदान करण्यासाठी करणार असल्याची माहिती व पुरावे आमच्याकडे आहेत. त्यासंदर्भात सोशल मीडियावरील विशेष करून आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडिओ क्लिप आम्ही निवडणूक आयोग व पोलिसांकडे सादर केल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी करून जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख, आमदार व राज्याचे माजी परिवहन मंत्री अँड.अनिल परब यांनी केली आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात आयोजित अंधेरी, चकला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी ही मागणी केली. यावेळी उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह  प्रमोद सावंत, नितीन डीचोलकर,संदीप नाईक,सुनील मोरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

एका बाजूने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना सहानभूती दाखवायची आणि दुसरीकडे नोटांचे बटण दाबून निषेध व्यक्त करायचा. हा निषेध म्हणजे उमेदवारी मागे घेणाऱ्या त्या उमेदवाराच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या पक्षावरील व्यक्त करणारा राग असल्याचे असे त्यांनी स्पष्ट केले. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार निवडूकीच्या रिंगणात असून स्वतः उमेदवार लटके यांनी पूर्ण मतदार संघ दोनदा घरोघरी जावून पिंजून काढला आहे. आगामी महापालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम असून प्रथमच महाआघाडी म्हणून एकत्र येवून ही पोटनिवडणुक लढवत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना ९८ टक्के मतदान होईल आणि मोठ्या मताधिक्याने असा विश्वास अँड.अनिल परब यांनी व्यक्त केला.

दिवंगत आमदार रमेश लटके यांची राहिलेली कामे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके येत्या दोन वर्षात पूर्ण करतील. कामगार हॉस्पिटल लवकर सुरू करणे,एसआरएचे राहिलेले प्रकल्प पूर्ण करणे, पाणी टंचाई दूर करणे, विभागातील नागरिकांना आणि हा मतदार संघात अनेक उद्योगधंदे असून येथे येणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे यावर निवडून आल्यावर आदी विविध विकासकामे पूर्ण करण्यावर त्यांचा भर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कॅगच्या चौकशीची भीती नाही

मुंबई महानगर पालिकेतील कारभाराची कॅग चौकशी होणार असे विचारले असता, कॅगची चौकशी ही तर नेहमीच केली जाते. खर्चाच्या कामाचे ऑडिट करून त्यातील तृटी दाखवण्याचे काम कॅग करते. त्यामुळे कॅगची चौकशी म्हणजेआता निवडणुका जवळ आल्याचे हे द्योतक असल्याचा टोला अनिल परब यांनी लगावला. कॅगच्या चौकशीची आम्हाला भीती नाही हे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यासाठी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपला उमेदवार काही उभा केला नाही. ही बाब आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहे. सता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज चार आठवड्यांनी पुढे ढकलली. मात्र, या सता संघर्षात आमचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

किशोरी पेडणेकर शिवसेनेची तोफ

एआरए प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव घेतले म्हणजे निवडणुका जवळ आल्याने विरोधकांना बदनाम करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. मात्र, किशोरी पेडणेकर यातर शिवसेनेची तोफ असून त्यांचा आवाज कोणी बंद करू शकत नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेअंधेरीनिवडणूक