मुंबई - राज्यात करोना विषाणू बाधित वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करत महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर रांगेत ताटकळत उभे राहून गर्दी करण्यापेक्षा महावितरणच्या आठवड्यातील 7 दिवस 24 तास उपलब्ध ऑनलाईन सेवेचा घरबसल्या वापर करून वीज बिलांचा भरणा केल्यास कोरोना विषाणूच्या संभावित प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज पुरवठ्याशी संबंधित सुविधेबाबत तक्रार दाखल करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने वीज ग्राहकांनी जाणिवपूर्वक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. नितीन राऊत म्हणाले.
वीज बिल भरण्यासाठी, नवीन वीज जोडणीसाठी, अर्ज करण्यासाठी, वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड ,नेटबँकीग,मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध ऑनलाईन सुविधेबाबत महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल या विभागात ग्राहकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याव्यतीरिक्त महावितरणच्या ग्राहकांना १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ /१९१२ या टोल फ्री क्रमांकावर काॅल करून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.