म्हाडा'च्या घरांसाठी आमचीच वेबसाइट वापरा; ऑनलाइन वेबिनारमध्ये आले असंख्य प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 06:19 AM2024-08-20T06:19:52+5:302024-08-20T06:20:00+5:30
म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता आयएचएलएमएस २.० ही नवीन नवी संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी 'म्हाडा'ची फेक वेबसाईट आल्याने खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित ऑनलाइन संगणकीय सोडतीकरिता अर्ज अधिकृत वेबसाईटरूनच करावा, असे आवाहन म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन वेबिनारमध्ये करण्यात आले.
म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता आयएचएलएमएस २.० ही नवीन नवी संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. अर्ज नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाइल नंबर आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. तसेच, अर्जदाराला डिजी लॉकरमध्ये स्वतःसह पती किंवा पत्नीचे आधार आणि पॅन कार्ड अपलोड करून ते लिंक करणे आवश्यक आहे. यामुळे म्हाडाला पडताळणी केलेली कागदपत्रे मिळणार आहेत.
तसेच अर्जदाराने १ जानेवारी २०१८ रोजी नंतर जारी केलेले व बारकोड असलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्रही वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे, असे मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांनी नमूद केले. दरम्यान, ऑनलाइन संगणकीय सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटचा अथवा अधिकृत अॅपचाच वापर करावा, असेही आवाहन मुंबई मंडळाद्वारे करण्यात आले आहे.