शिवसेना भवनजवळ प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:01 AM2018-08-09T02:01:15+5:302018-08-09T02:01:18+5:30

शासनाने प्लॅस्टिकबंदीचा घेतलेला निर्णय आता प्रत्यक्ष लागू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे.

Use of plastic bags at Shivsena Bhawan | शिवसेना भवनजवळ प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

शिवसेना भवनजवळ प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

googlenewsNext

- अजय परचुरे 
मुंबई : शासनाने प्लॅस्टिकबंदीचा घेतलेला निर्णय आता प्रत्यक्ष लागू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यापासून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन पथकाने कारवाईही केली. केवळ कारवाई नाही, तर पाच हजार रुपये दंडही ठोठावला, पण ‘प्लॅस्टिक पिशवी बंद’चा आता पुरता फज्जा उडाला आहे. कारवाईची धार ओसरल्यानंतर मात्र मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दादरमधील शिवसेनाभवनापासून हाकेच्या अंतरावर असणाºया प्लाझा थिएटरसमोर फेरीवाले,भाजीविक्रेते बिनधास्त प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळत आहेत.
दादर मुंबईतले मध्यवस्तीतील महत्त्वाचे शहर आहे. स्टेशनला लागून असलेली क्रांतिसिंह नाना पाटील मंडई ते शिवसेना भवनापर्यंतच्या रस्त्यावर छोटे-मोठे असंख्य फेरीवाले दिवसभर माल विक्रीसाठी घेऊन बसलेले असतात. दादर स्टेशनसमोरील नक्षत्र मॉल ते प्लाझा थिएटरपर्यंत अनेक भाजी विक्रेते, फळ विक्रेते, कपडे विक्रेते असतात. प्लॅस्टिकबंदीनंतर पालिकेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत या फेरीवाल्यांवरही कारवाई करून, त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला होता. मात्र, ही कारवाईची धार जसजशी बोथट झाली, तसे या फेरीवाल्यांनी प्लॅस्टिक पिशवीचा वापर पुन्हा एकदा सुरू केला आहे. भाजी, फळे, कपडे विकत घेणाºया ग्राहकांना सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्या देत आहेत. कहर म्हणजे याच भागात काही फेरीवाले प्लॅस्टिक पिशव्यांचीही विक्री करत आहेत. शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असणाºया या सर्व परिसरात ही विक्री होत असूनही पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने, महिनाभर केलेली दंडात्मक कारवाई हा पालिकेचा निव्वळ फार्स असल्याची चर्चा येथील नागरिक करत आहेत.
दादरबरोबरच सायन,माटुंगा भागातील जीटीपीनगर परिसरातही फेरीवाल्यांनी प्लॅस्टिक पिशवीच्या वापराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे ग्राहकही कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करायला लागले असताना, फेरीवाल्यांनी मात्र या बंदीला हरताळ फासला आहे.
मुंबईतील सर्व मॉल्स, दुकानदार यांनी संपूर्णपणे प्लॅस्टिक पिशवीला बंद केले असताना, रस्त्यावर अनधिकृतपणे बसणाºया फेरीवाल्यांनी कारवाई संपताच, आपल्याकडे राहिलेल्या प्लॅस्टिक पिशव्या पुन्हा वापरात काढल्या आहेत.
या फेरीवाल्यांवर महापालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे येत्या काळात हा प्लॅस्टिकचा वापर संपूर्ण मुंबईभर पुन्हा सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Use of plastic bags at Shivsena Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.