अलिबाग : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम केल्यास जिल्ह्याचा विकास सहजतेने होईल. जनतेचे प्रश्न, समस्यांचे निराकरण होण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अधिकाराचा वापर सामाजिक दृष्टिकोन ठेवून करावा असा सल्ला राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिला. सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतलेल्या पहिल्याच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले, शासन म्हणून आपण कुठलाही विषय, प्रस्ताव समाजाची गरज म्हणून काम केल्यास त्यांचा विकास होईल. जनतेला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मेहता यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये काम करताना वैचारिक मतभेद विसरु न काम करावे. समस्या छोटी अथवा मोठी असो ती समन्वयाने सोडविण्यावर भर दिला पाहिजे, जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून यामध्ये अनेक प्रश्न व समस्या आहेत. त्या सोडवून विकास करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. मनोहर भोईर, आ. सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.