‘त्या’ दहा लसीकरण शिबिरांत सलाइन वॉटरचाच वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:20+5:302021-07-02T04:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील बोगस लसीकरणानंतर उघड झालेल्या दहा शिबिरांत सलाइनचे पाणीच दिल्याचे विश्वास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील बोगस लसीकरणानंतर उघड झालेल्या दहा शिबिरांत सलाइनचे पाणीच दिल्याचे विश्वास नांगरे-पाटील (सहपोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था) यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र अद्याप ७८४ लसींचा हिशेब पोलिसांना लागत नसून त्यानुसार चौकशी सुरू आहे. बोगस लसीकरण प्रकरणात अद्याप मुंबईत नऊ आणि ठाण्यात एक असे १० गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान, पालिकेने शिवम रुग्णालयाला पुरविलेल्या एकूण कोविडच्या एकूण मात्रांतून १७,१०० लोकांचे लसीकरण होणे आवश्यक होते. मात्र चौकशीत अजून ७८४ लोकांना लस दिली गेल्याचे दिसत असल्याने या लसी नेमक्या कुठून आल्या, याबाबत चौकशी सुरू आहे.
विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांत अजून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, यात मुख्य सूत्रधार डॉ. मनीष त्रिपाठी, शिबिराचे काम सांभाळणारा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा कर्मचारी राजेश पांडे यांच्यासह शिवम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या प्रकरणी एकूण १३ जणांना अटक करण्यात आली असून, १० शिबिरांमध्ये दोन हजार ६८६ जणांना लस दिली गेली आहे. यात लस देणाऱ्या नर्सिंगच्या मुलांना साक्षीदार बनविण्यात आले असून, लसीची ने-आण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी महेंद्रसिंग हा गुडीया यादवला प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नाव आणि माहिती पुरवायचा हे उघड झाले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातही लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तेथेही एक हजार लोकांना अशा प्रकारे लस दिल्याची माहिती आहे. अंबोली पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे; तर डॉ. त्रिपाठीच्या सहीचे नऊ प्रमाणपत्र नऊ प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
शिवम रुग्णालय सील करणार?
शिवम रुग्णालयाला एक लाख लसी हव्या होत्या. मात्र एक लाख लस जर हव्या असतील तर त्यांना पाच कोटी रुपये अनामत रकमेच्या स्वरूपात संबंधित औषध कंपनीकडे जमा करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सलाइन वॉटरमधून पैसे कमवून पाच कोटी जमा करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा धंदा सुरू केला. त्यामुळे शिवम रुग्णालय सील करण्याबाबत पत्रव्यवहार पोलिसांनी सुरू केला आहेत.