सॅटेलाइट फोनचा वापर; इटलीच्या नर्सविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:27 AM2019-07-15T06:27:43+5:302019-07-15T06:27:49+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग विभागातील एका एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून सॅटेलाइट फोनचा वापर करण्यात आल्याप्रकरणी इटलीच्या परिचारिकेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Use of satellite phones; Offense against Italian nurse | सॅटेलाइट फोनचा वापर; इटलीच्या नर्सविरोधात गुन्हा

सॅटेलाइट फोनचा वापर; इटलीच्या नर्सविरोधात गुन्हा

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग विभागातील एका एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून सॅटेलाइट फोनचा वापर करण्यात आल्याप्रकरणी इटलीच्या परिचारिकेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ६ जुलै रोजी ही घटना समोर आली होती.
याबाबत अलर्ट वाजल्यानंतर मुंबई पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांनी त्वरित चौकशी केल्यावर, हा सिग्नल विमानतळामध्ये पार्क करण्यात आलेल्या चार्टर्ड फ्लाइटमधून आल्याचे समोर आले. हे विमान एअर अ‍ॅम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येत होते. हे विमान युएईमधून मुंबईत आले होते व विमानात आणखी दोन केबिन क्रूंचा समावेश होता. विदेशी नागरिकांना भारतात सॅटेलाइट फोनवर बंदी असल्याची माहिती नसल्याने अनेकदा ते याचा वापर करतात, असे सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एसयूए ५४१ या विमानात सदर परिचारिका सॅटेलाइट फोनचा वापर करत होती.
इटलीहून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाला एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे इटलीला उपचारांसाठी नेण्यासाठी हे विमान मुंबईत आले होते. सदर पर्यटक मुंबईतून लेह लडाखला गेले होते. तिथे त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला व त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. भारतीय वायरलेस कायदा १९३३च्या कलम ६ अन्वये व इंडियन टेलिग्राफ कायदा (आयटीए) १९८५च्या कलम २०, २१ अन्वये त्या परिचारिकेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी इटलीच्या दूतावासासोबत संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली आहे. दूतावासाच्या माध्यमातून सदर परिचारिकेला मुंबई पोलिसांच्या ताब्यात द्यावे व तिच्याविरोधातील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात येईल. तिच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये तिला कमाल ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Use of satellite phones; Offense against Italian nurse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.