परमबीर सिंहकडून लाच देण्यासाठी सिक्रेट फंडचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:49+5:302021-09-13T04:05:49+5:30
सायबर एक्सपर्टला ५ लाख दिल्याची ऑर्डलीची कबुली जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वादग्रस्त आयपीएस व मुंबईचे ...
सायबर एक्सपर्टला ५ लाख दिल्याची ऑर्डलीची कबुली
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वादग्रस्त आयपीएस व मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंहने सिक्रेट फंडचा (गोपनीय निधी) गैरवापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला असल्याचे उघड झाले आहे. अँटेलिया स्फोटक कार प्रकरणात खोटा अहवाल देण्यासाठी सायबर तज्ज्ञाला ५ लाखांची लाच देण्यासाठी त्यांनी या निधीतून पैसे वापरल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासातून समोर आले आहे.
परमबीर यांच्याकडे सहायक (ऑर्डली) म्हणून काम करण्याऱ्याने ही रक्कम रोख स्वरूपात दिली होती. एनआयएच्या जबाबात त्याने त्याची कबुली दिली आहे. मात्र हा निधी कोणत्या कामाच्या बदल्यात दिला याची आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
खंडणी व गैरकृत्याचे अनेक गुन्हे व तक्रारी असलेले परमबीर सिंह आजारी रजेच्या निमित्ताने गेल्या ५ महिन्यांपासून ‘बेपत्ता’ आहेत. त्यांच्यासोबत ‘होमगार्ड’मध्ये आलेल्या अंमलदाराने हा जबाब दिला आहे. त्यांना खात्यातर्गत उपनिरीक्षक म्हणून नुकतीच बढती मिळाली आहे. एनआयएच्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबीचा उलगडा झाला आहे. तत्कालीन आयुक्त परमबीर जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवाल देण्यासाठी ५ लाख दिल्याची कबुली सायबर तज्ज्ञांनी जबाबाबाबत दिली आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ज्याच्याकडून ही रक्कम घेतली त्याचा जबाब घेतला असता त्याने आयुक्तांच्या सूचनेनुसार सिक्रेट सर्व्हिस फंडातून रक्कम काढून दिल्याची कबुली दिली.
संबंधित ऑर्डली सुमारे १२ वर्षांपासून परबीर यांच्या बरोबर काम करतो. ते अप्पर आयुक्त म्हणून एटीएसला होते, तेव्हापासून तो त्यांच्या समवेत आहे. प्रत्येक नियुक्तीच्या ठिकाणी ते त्याला सोबत घेऊन जात राहिले.
---------------
यासाठी करायचा असतो सिक्रेट फंडचा वापर
जटील गुन्ह्याचा उलगडा, संभाव्य घातपाती कृत्याबाबत माहिती देणाऱ्या खबऱ्यासाठी, त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी ‘सिक्रेट फंड’ची तरतूद केलेली असते. प्रत्येक घटकप्रमुख, एटीएस, एसआयडीसाठी हा निधी ठेवलेला असतो, त्याचे ‘ऑडिट’ किंवा रेकॉर्ड तपासले जात नाही, विभाग प्रमुख, घटक प्रमुखाच्या मान्यतेने रक्कम खर्च केली जाते. पण परमबीर सिंहने खोटा रिपोर्ट बनविण्यासाठी रक्कम वापरली आहे.
-----------------
एनआयच्या तपासात परमबीर यांच्याशी निगडित अनेक मुद्दे समोर येऊनही त्यांचा उल्लेख आरोपपत्रात का नाही, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी एनआयएला याविषयी विचारणा होऊ शकते, त्यामुळे गुन्ह्याचा तपास अद्यापही सुरू असल्याचे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते.