दीपक मोहिते , वसई - निवडणुका संपल्या... निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप, टिका-टिपण्णी इ. प्रकार सर्रास होत असतात. पालघर लोकसभा निवडणुकीदरम्यानही असे प्रकार घडले. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर हे प्रकार थांबायला हवेत, परंतु ते अद्याप थांबलेले नाहीत. निवडणुकांच्या दरम्यान एकमेकांसमोर उभे ठाकलेले निवडणुकानंतरही चिखलफेक करताना पहावयास मिळत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून देशात परिवर्तन घडून आले. या माध्यमाचा वसई-विरार उपप्रदेशात गैरवापर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही व्यक्ती व्हॉट्सअप माध्यमाचा वापर केवळ द्वेष व मत्सर व्यक्त करण्यासाठी करत असल्याचे दिसून येते. आपल्या देशात व्यक्तीस्वतंत्र्याला आडकाठी नाही, पण त्याचा वापर करताना तारतम्य बाळगायला हवे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी अशा माध्यमातून जनतेची दिशाभुल करण्याचे प्रयत्न निषेधार्ह आहेत. नागरीकांमध्ये गैरसमज निर्माण होतील, असे संदेश या माध्यमातून देणे चुकीचे ठरेल. गेल्या आठवड्यात ‘जाणता राजा’ या नाट्यप्रयोगादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून अनेकजण जखमी झाले. या गॅलरीत क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षक आल्यामुळे ही घटना घडली. घटना दुर्दैवी होती हे सर्वांनाच मान्य आहे, पण त्याचे राजकारण होता कामा नये, पण दुर्दैवाने विरोधी पक्षाने या घटनेचे राजकारण केले. अपघात व्हावा म्हणून कोणीही गॅलरीचे काम तकलादु स्वरूपाचे करेल का? याचा विचार करणे गरजेचे होते. परंतु विरोधी पक्षाने महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप केला. आपल्या भागातील नागरीकांना हा ऐतिहासिक नाट्यअविष्कार मोफत पहावयास मिळावा अशा उद्देशाने महानगरपालिकेने केलेल्या या प्रयत्नाला या अपघाताचे गालबोट लागले. हे जरी खरे असले तरी अशी घटना घडावी, असा उद्देश कुणीच बाळगला नसावा. काही जणांनी गॅलरीचे काम तकलादू स्वरूपाचे करण्यात आले, असा आरोप करीत मनपा प्रशासन अधिकारी व सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तो नक्कीच दुर्दैवी आहे. दुसर्या घटनेतही विरोधीपक्ष जबाबदारीने वागला नसल्याचे दिसून आले आहे. वसई-विरार मनपा हद्दीत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी महामार्गालगत फुटली. तिच्या दुरूस्तीसाठी तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरी भागात नागरीकांना पाणी मिळू शकले नाही. अशा आपत्तीच्या वेळी विरोधीपक्षाकडून सहकार्याची अपेक्षा असताना सहकार्य बाजुलाच राहिले उलट आरोपांच्या फैरी झडल्या. जलवाहिनीची दुरूस्ती पुर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत काही पाणी कमी पडत आहे. तिढा सोडवण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नात अडथळे आणणारे कोण आहेत, याचा विचार आरोप करणार्यांनी करायला हवा.
सोशल मीडियाचा वापर वसईच्या विकासासाठी व्हावा
By admin | Published: May 26, 2014 4:52 AM