Join us

पुलांसाठी अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 2:55 AM

मुख्यमंत्री; आवश्यकता भासल्यास बेस्ट बसच्या प्रवासात सवलत द्या

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बांधण्यात येणारे पादचारी, वाहतूक, रेल्वे पुलांचे आयुष्यमान दीर्घकालीन असावे याकरिता महापालिका, रेल्वेने अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना केल्या. शिवाय ज्या भागातील पूल, रस्ते वाहतुकीस बंद आहेत; त्याबाबत पर्यायी मार्गांची माहिती देण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आवश्यकता भासल्यास बेस्ट बसच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई महापालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील तब्बल २९ पूल दुरुस्तीसह पुनर्बांधणीकरिता बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याबाबतची कार्यवाही सुरू केली. मात्र ऐन पावसाळ्यात २९ पूल बंद झाल्यानंतर मुंबईची होणारी अवस्था लक्षात घेता मुंबईकरांसह लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनावर टीका करण्यास सुरुवात केली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेस आला; आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टीकास्त्र उगारले. यातच आता बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबईतील धोकादायक पुलांच्या कामाबाबत आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, राज पुरोहित, अमित साटम, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, मध्य रेल्वेचे मंडल महाप्रबंधक संजयकुमार जैन, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिल गुहा उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत म्हणाले, विविध प्रशासकीय यंत्रणांमार्फत पुलांचे काम केले जाते. हे बांधकाम ३० ते ३५ वर्ष टिकणारे नसावे; तर त्याहून अधिक काळ ते टिकेल, अशी रचना करावी. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. जे रस्ते, पूल बंद करण्यात आले आहेत; त्याबाबत नागरिकांना माहिती होईल याकरिता मार्गदर्शक फलक लावावेत. पुलाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. वाहतूक वळविण्यात आली आहे त्याबाबत माहिती देण्यासाठी मोबाइल अ‍ॅप तयार करावे. बाजारपेठेच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते तेथे ठरावीक अंतरावर वाहनतळाची व्यवस्था करावी. तेथून नागरिकांना बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी. परिणामी, कोंडीचा ताण कमी होईल.च्मुंबईत ३४४ पूल असून त्यातील ३१४ पूल मुंबई पालिकेच्या तर, ३० पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील आहेत. यातील २९ पूल स्ट्रक्चरल आॅडिटनंतर बंद करण्यात आले.च्९२ पूल सुस्थितीत असून ११६ पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येत आहे.च्६७ पुलांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत मध्य रेल्वेमार्फत ६८ तर पश्चिम रेल्वेमार्फत ३२ पादचारी पूल नव्याने बांधले आहेत.आधिुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुरुस्तीघाटकोपर आणि जुहू तारा रोड या दोन पुलांची आयआयटी आणि व्हीजेटीआयमार्फत पुनर्तपासणी करण्यात आली असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले केले जातील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसबेस्टमुंबई