कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:06 AM2021-09-27T04:06:50+5:302021-09-27T04:06:50+5:30
मुंबई : कोरोनाची लस घेतली म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही, असे नाही. तुम्ही मास्क वापरत नसाल, तुम्ही सामाजिक अंतर ...
मुंबई : कोरोनाची लस घेतली म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही, असे नाही. तुम्ही मास्क वापरत नसाल, तुम्ही सामाजिक अंतर पाळत नसाल, नीट हात धूत नसाल, तुम्ही जर कोरोनाचे नियम पाळत नसाल, तर तुम्हाला कोरोना होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे कोरोनाचे नियम पाळणे हा होय. थोडक्यात त्रिसूत्री पाळली, तर कोरोना होणार नाही, असा दावा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. शिवाय कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लस घ्या, गर्दी करू नका, मास्क वापरा, या त्रिसूत्रीचा वापर करा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ लागला तेव्हा अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्क्रीनिंग सेंटर म्हणून सुरू करण्यात आले होते. स्क्रीनिंग म्हणजे विविध देशांतून जे आंतरराष्ट्रीय प्रवासी येथे दाखल होत होते त्यांची तपासणी केली जात होती. अगदी सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने सात देशांत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे म्हटले होते. ८ मार्च २०२० पासून विमानतळावर स्क्रीनिंग सुरू करण्यात आले होते. रुग्णालयाचे डॉक्टर आणि सर्व कर्मचारी विमानतळावर होते. स्क्रीनिंग करताना काही प्रवासी आढळले की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणार होते. त्यावेळी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात होते. मात्र, कालांतराने रुग्णांची संख्या वाढत गेली आणि बेड कमी पडू लागले. अशावेळी मग महापालिकेने निर्णय घेतला की, सेव्हन हिल रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जावेत. तेव्हा येथे ३०० बेड होते. मात्र, कालांतराने येथील सगळ्या सेवा सुरू झाल्या. आजघडीला येथे १ हजार ८५० बेड असून, २ हजारांपेक्षा अधिक सेवा दिल्या जात आहेत, असे अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बालकृष्ण अडसूळ, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. स्मिता चव्हाण आणि ओएसडी डॉ. महारुद्र कुंभार यांनी सांगितले.
-----------
सगळ्या सेवा मोफत
अगदी सुरुवातीला डायलिसिस रुग्णांना सेवा मिळत नव्हती. तेव्हा येथे डायलिसिस सुरू करण्यात आले. दिवसाला ३०० डायलिसिस होत होते. शिवाय याच काळात ३०० आयसीयू बेड सुरू करण्यात आले. मुंबई महापालिकेचे हे रुग्णालय असून, येथील सगळ्या सेवा या मोफत दिल्या जातात. आजघडीला ३८ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. येथील मृत्यूदरही जास्त आहे. कारण येथे अतिजोखीम असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले.
-----------
कोरोनाचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी विलंबाने दाखल झाले, तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होतो. प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी उपचार केले गेले पाहिजेत. पहिल्या चार दिवसांत उपचार सुरू केले, तर रुग्ण लवकर बरा होतो. पहिले सहा दिवस दुर्लक्ष केले, तर स्थिती गंभीर होते.
-----------
रुग्णांना पहिल्यांदा वाफ दिली गेली. त्याचा मोठा फायदा झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या सेवा दिल्या जात होत्या त्या सगळ्या सेवा येथे दिल्या गेल्या.
-----------
कोरोना रुग्णांना समुपदेशन गेले केले. याचा मोठा फायदा झाला. ६०० हून अधिक रुग्णांना याचा फायदा झाला.
-----------
कोरोना रुग्णांना नातेवाइकांसोबत बोलण्यासाठी टॅब देण्यात आले होते. सर्वसाधारण रुग्णांना फोनला परवानगी दिली होती. त्यामुळे त्यांना नातलगांशी बोलता येत होते.
-----------
सातशे नर्स (पुरुष व महिला) येथे कार्यरत आहेत. तीनशेहून अधिक डॉक्टर काम करत आहेत. हे सगळे कोरोना रुग्णांसाठी काम करत आहेत.
-----------
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना म्हणजे तीस वर्षांवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बाधा झाली होती. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण कमी होते.
-----------
कोरोना झाला म्हणजे आपला मृत्यू होणार आहे, असे नाही. उपचार लवकर केले, तर मृत्यूचे प्रमाण शून्य होईल.