जलसाठा आटतोय, पाणी जपून वापरा; मुंबईकरांसाठी उरले ८ टक्के पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:07 AM2020-06-30T04:07:34+5:302020-06-30T07:10:11+5:30
मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १०० ते १५० कि.मी.वरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते.
मुंबई : यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ आठ टक्के जलसाठा सध्या शिल्लक आहे. तसेच जून महिनाही कोरडाच राहिल्यामुळे मुंबईकरांवर चिंतेचे ढग दाटले आहेत. तरीही तूर्तास पाणीकपात करणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा आणि शासनाच्या भातसा, अप्पर वैतरणा या धरणांमधून मुंबईकरांना दररोज तीन हजार आठशे दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदाचा उन्हाळा सुकर झाला. कोरोनाशी लढा देणाºया मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. मात्र मान्सून वेळेत दाखल झाल्यानंतरही अद्याप मुंबईत पावसाची चिन्हे नाहीत. त्यामुळे तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. सध्या जून महिन्याच्या अखेरीस तलावांमध्ये एक लाख २४ हजार दशलक्ष लीटर म्हणजेच ८.५७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा पुढील महिनाभर पुरेल एवढा असल्याने सध्या पाणीटंचाईबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. गेल्या वर्षी २९ जून २०१९ रोजी तलाव क्षेत्रात पाच टक्के जलसाठा होता.
यापूर्वी तीन वेळा ओढवले होते संकट
२००९ मध्ये तलाव क्षेत्रात अपुरा पाऊस झाला होता. यामुळे सन २०१० मध्ये मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता, तसेच २०१४ मध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग, विहिरींची सफाई, बोअरवेलचा वापर अशा अपारंपरिक पद्धतीने पाणी साठवण्याचे प्रयत्न झाले. मात्र कालांतराने हे सर्व प्रयत्न मागे पडले आणि तलावातील जलसाठ्यावरच महापालिका अवलंबून राहू लागली. अपुºया पावसामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत काही काळ दहा टक्के पाणीकपात होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला.
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यापैकी २५ टक्के म्हणजेच ९०० दशलक्ष लीटर पाणी गळती आणि चोरीमध्ये वाया जाते. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर साठा असणे अपेक्षित असते.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १०० ते १५० कि.मी.वरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते. हे पाणी २४ विभागांत असणाºया टेकड्यांवरील भूमिगत जलाशयातून त्या-त्या विभागात पुरविण्यात येते. मात्र लॉकडाऊन काळात उद्योगधंद्याला लागणारे १५ टक्के पाणी टाक्यांमधील राखीव कोट्यात शिल्लक राहत असल्याचे सूत्रांकडून समजते.
पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. १५ जुलै दरम्यान तलावातील जलसाठा व पावसाचा आढावा घेण्यात येणार आहे. - अजय राठोड, प्रमुख जल अभियंता