पाणी जपून वापरा
By admin | Published: July 17, 2014 01:53 AM2014-07-17T01:53:33+5:302014-07-17T01:53:33+5:30
शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
नवी मुंबई : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. उद्यान व दुभाजकांमधील नळजोडण्याही बंद करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेस मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेमध्ये धरणात पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात धरण क्षेत्रात १८२७ मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता. यावर्षी सदर प्रमाण ४५९ एवढे आहे. पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी धरण परिसराची पाहणी केली. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे निदर्शनास आले. धरण क्षेत्रात गत १० वर्षांत झालेल्या पर्जन्यमानाची माहिती घेण्यात आली. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व बेलापूरमधील जलउदंचन केंद्राचीही पाहणी करण्यात आली.
मोरबे धरणात ६३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. नवी मुंबईकरांसाठी एवढे पाणी पुरेसे आहे. परंतु भविष्याचा विचार करता पाणी जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने उद्यान, रस्ते दुभाजकामधील बगिचे यांच्या नळजोडण्या बंद केल्या आहेत. यामुळे १२ ते १४ दशलक्ष लिटर पाणी वाचणार आहे. पाणी बचतीसाठीची पत्रके शहरात वाटण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)