मुंबई : मुंबई महापालिकेने दादर सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचा विलगीकरण केंद्रासाठी अडीच महिने वापर केला. परिणामी वीज आणि पाण्याचा मोठा खर्च वाचनालयास आला. आता हा खर्च महापालिकेने वाचनालयास देणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेने याबाबत वाचनालयास काहीच मदत केली नाही. आता कोरोनामुळे वाचनालयाची आर्थिक स्थिती थोडी का होईना ढासळली आहे. त्यात आता पालिकेने काहीच मदत केली नसल्याने वाचनालयावर आर्थिक संकट ओढावले आहे.
महापालिकेने कोरोना काळात दासावाच्या इमारतीमधील धुरु हॉल व दासावा या दोन सभागृहात विलगीकरण केंद्र सुरु केले. अडीच महिने ही केंद्र सुरु होती. जुलै महिन्यात कोरोनाचे संक्रमण कमी झाले. तेव्हा ही केंद्र बंद करण्यात आली. मात्र केंद्रासाठी पाण्याचा, विजेचा वापर करण्यात आला. या खर्चाचा भार मात्र संस्थेवर पडला. आता हा खर्च संस्थेने केला असला तरी याची परतफेड पालिकेने करणे गरजेचे आहे, अशा आशायचे पत्र संस्थेने पालिकेला दिले आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून वाचनालय बंद आहे. त्यामुळे संस्थेचे उत्पन्न शून्य आहे. मात्र देखभाल खर्चासह उर्वरित खर्च तर सुरुच आहे. परिणामी पालिकेने संस्थेला खर्चाची परतफेड करावी, असे संस्थेचे म्हणणे आहे.
बेस्टकडून आलेली वीज बिले वेळेवर भरावी लागत असून, संस्थेला टेलिफोन, जीएसटी, सेवकांचे वेतन आदी खर्च करण्यासाठी बँकेतील ठेवी मोडव्या लागल्या आहेत. परिणामी ही रक्कम परत मिळावी यासाठी संस्थेने पत्रव्यवहार केला आहे. संस्थेच्या या पत्र व्यवहावर महापालिका नेमकी काय भूमिका घेते? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.