मुंबई : सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केला. मुस्लिमांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आजवर झालेली नाही. सत्तेत नसताना मुस्लीम आरक्षणासाठी भाषणबाजी करणाऱ्यांची तोंडे सत्तेत आल्यावर मात्र बंद झाली आहेत. त्यामुळे समाजाने पक्ष, नेता, सर्व झेंडे बाजूला ठेवून आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केले. एमआयएमच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मिरवणूक, सभा, रॅली, मोर्चा, निदर्शने यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे पोलिसांनी रॅलीला मज्जाव केला. या पार्श्वभूमीवर चांदिवलीतील जाहीर सभेत ओवेसी बोलत होते. खा. ओवेसी म्हणाले, "की मुस्लिमाने तिरंगा हातात घेतला, तर त्याला तुमचा विरोध का होतोय? ही आमच्या बुजुर्गांची निशाणी आहे. स्वातंत्र्यसंग्रामशी ज्यांचा संबंध नाही, तेच आज राष्ट्रवादाची भाषा करीत आहेत. पण तिरंगा हाच खरा राष्ट्रवाद आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. राहुल गांधी मुंबईत आल्यावर अशीच जमावबंदी लागेल का?" मुस्लिमांची ९३ हजार एकर जमीन हडपली गेली आहे. न्यायालयाने ५ टक्के आरक्षण मान्य करूनही सरकारला ते मान्य नाही. याचा जाब विचारण्यासाठी येत असल्याने आपली अडवणूक केल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.सभेत सहभागी होण्यासाठी खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या समर्थकांच्या कार ताफ्यासह मुंबईत दाखल झाले. औरंगाबाद येथून त्यांनी रॅली काढली होती. या पार्श्वभूमीवर वाशी टोलनाका येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याठिकाणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या मुंबईत जाणाऱ्या गाड्या अडवून त्याची झडाझडती घेतली जात होती. अखेर संध्याकाळी सहाच्या सुमारास खा. इम्तियाज जलील यांचा ताफा वाशी टोलनाक्यावर दाखल झाला. त्यावेळी अडविल्यानंतर जलील यांनी सरकारवर टीका केली.मुंबईत कडेकोट बंदोबस्तमुस्लीम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या एमआयएम पक्षाने पोलिसांनी लागू केलेल्या बंदी आदेशाला झुगारत तिरंगा रॅली आयोजीत केल्याने पोलिसानी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, ज्यात ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दल व अन्य फोर्सचा समावेश होता.
सत्तेतील काँग्रेस, राष्ट्रवादीनं मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून केला वापर : असदुद्दीन ओवेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 7:30 AM