फिटनेससाठी ‘भरतनाट्यम्’ उपयुक्त
By Admin | Published: July 6, 2017 06:58 AM2017-07-06T06:58:53+5:302017-07-06T06:58:53+5:30
भरतनाट्यम् ही प्राचीन भारतीय नृत्यकला फिटनेससाठी अत्यंत उपयुक्त
- मुलाखत : अक्षय चोरगे
भरतनाट्यम् ही प्राचीन भारतीय नृत्यकला फिटनेससाठी अत्यंत उपयुक्त आहे. चांगले दिसण्यासाठी, चांगल्या फिगरसाठी जिममध्ये जाण्याची सध्या फॅशन झाली आहे. तथापि, भरतनाट्यम् या भारतीय संस्कृतीतील समृद्ध नृत्यप्रकारामुळे पायांच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत परिपूर्ण व्यायाम मिळतो. भरतनाट्यम् करणाऱ्या कलाकाराला व्यायामशाळा किंवा जिममध्ये जाण्याची गरज नाही. तसेच तारुण्य अबाधित ठेवण्यासाठीही भरतनाट्यम् उपयुक्त असल्याचे मत विलेपार्ले येथील तंजावूर नृत्यशाळेच्या ज्येष्ठ नृत्यशिक्षिका गुरू तेजस्विनी लेले यांनी ‘लोकमत’कडे मांडले. फक्त तमिळी लोकांची मक्तेदारी असलेली सुमारे दोन हजार वर्षांपासून प्रचलित असलेली भरतनाट्यम् ही नृत्यशैली तेजस्विनी लेले यांनी ५० वर्षांपूर्वी आत्मसात केली. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या भरतनाट्यम् शिकू लागल्या. चौदाव्या वर्षी त्या नृत्य विशारद झाल्या. आत्तापर्यंत हजारो मुली त्यांच्याकडून भरतनाट्यम्मध्ये नृत्य विशारद झाल्या आहेत. वेणुगोपाल पिल्लै यांच्याकडून भरतनाट्यम्चे बाळकडू मिळवलेल्या लेले यांनी आत्तापर्यंत जगभर भरतनाट्यम्चे सादरीकरण केले आहे.
भरतनाट्यम् ‘फिटनेस’साठी कशा प्रकारे उपयुक्त ठरते?
- हा नृत्यप्रकार फिटनेससाठी खूप उपयुक्त आहे. भरतनाट्यम् करताना पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना उत्तम व्यायाम मिळतो. अनेक नृत्यांगना चांगल्या फिगरसाठी जिममध्ये घाम गाळतात, परंतु भरतनाट्यम् करणाऱ्या नृत्यांगनांना जिममध्ये जाण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर तारुण्य अबाधित ठेवण्यासाठी भरतनाट्यम् फायद्याचे आहे.
झुंबा, बॅले आणि अशा अनेक विदेशी नृत्यप्रकारांची सध्या देशात क्रेझ वाढत आहे, त्यामागची कारणे काय?
- रियलिटी शोंमुळे विदेशी नृत्यप्रकारांची तरुणांमध्ये क्रेझ वाढली आहे. त्याचबरोबर आपली संस्कृती दाखविण्यात आणि त्याचे जतन करण्यात आपण मागे पडलो, हेही तितकेच खरे आहे. परंतु विदेशी नृत्यप्रकारांत जीव नाही. फार काळ ते टिकणारे नाहीत. रोज नवे विदेशी नृत्यप्रकार शिकवणारे क्लासेस कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उगवतात आणि अवघ्या काही काळात बंदसुद्धा होतात.
मग हे रोखण्यासाठी नेमके काय करायला हवे?
- आपल्या संस्कृतीला, इथल्या नृत्यप्रकारांना मोठ्या स्तरावर नेण्यासाठी खूप कमी लोक धडपडतात. आपल्याकडे व्यावसायिकतेचा अभाव आहे. नृत्य शिक्षकांमध्ये अथवा अशा संस्था चालवणाऱ्यांनी व्यावसायिकता आत्मसात करण्याची गरज आहे. तरच ते इथल्या कलेला जगभर पोहोचवू शकतील. त्याचबरोबर कलेला ‘अपडेट’ आणि ‘अपग्रेड’ करण्याची नितांत आवश्यकता आहे. मी माझे गुरू सचिन शंकर यांच्याकडून व्यावसायिकता शिकले आणि माझ्या कलेला, नृत्यशैलीला अपडेट केले. त्यामुळे मी विदेशी नृत्यशाळांच्या सोबत स्पर्धेत उभी आहे.
तमिळनाडू सोडून देशातल्या इतर राज्यांत आणि जगभरात भरतनाट्यम् सादर करताना, शिकवताना काही अडचणी आल्या का?
- सुरुवातीला भाषेच्या अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून परदेशात सादरीकरण करताना भाषेचा वापर करणे बंद केले. केवळ संगीताच्या तालावर आणि सुरांच्या साथीने अनेक युरोपियन देशांत भरतनाट्यम्चे सादरीकरण केले. विशेष म्हणजे लोकांनी त्याला भरभरून दाद दिली. आपल्या देशातील तमिळनाडू सोडून इतर राज्यांत गाण्यांचे भाषांतर करून सादरीकरण केले. मराठी, कानडी, गुजराती, तेलुगू आणि राजस्थानी भाषांमध्ये केलेले भाषांतर आणि त्यावर केलेले सादरीकरण सर्वत्र कौतुक झाले. परंतु भाषांतर करत असताना मूळ सुरांना, गाण्यांच्या अर्थाला कुठेही धक्का लागू दिला नाही. आता मराठी गाण्यांचे तमिळ भाषांतर करून त्यावर नृत्यसादरीकरण करण्याची खूप इच्छा आहे.
भरतनाट्यम् किंवा कथ्थक अशा नृत्यप्रकारांमध्ये करिअरच्या कोणत्या संधी आहेत?
- कलाकार म्हणून नक्कीच चांगल्या प्रकारे काम करू शकतो. नृत्य शिक्षक म्हणून काम करू शकतो. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करता येणे शक्य आहे. या क्षेत्रामध्ये विशारद झाल्यानंतर आपोआप सिनेजगताची दारेसुद्धा खुली होतात.
तमिळ नृत्यप्रकारात पारंगत झाल्यानंतर तुम्हाला तमिळ जनतेने कसे स्वीकारले?
- सहज स्वीकारले नाही, सुरुवातीला प्रश्नार्थक नजरेने पाहतात. परंतु माझे नृत्य पाहिल्यानंतर भरभरून कौतुक करतात. तमिळी लोक अत्यंत रूढीप्रिय आणि पुराणवादी असल्यामुळे ते कोणत्याही गैरतमिळ कलाकाराला स्वीकारत नाहीत.
भरतनाट्यम्, कथ्थक या मुलींसाठीच्या कला मानल्या जातात. त्यामुळे या कला आत्मसात केलेल्या मुलांमध्ये स्त्रीत्व निर्माण होऊ लागते, यात कितपत तथ्य आहे?
- काही अंशी हे खरे आहे. अनेक मुलांमध्ये या कला आत्मसात करताना स्त्रीत्व काही प्रमाणात निर्माण होते. माझे तिन्ही गुरू वेणुगोपाल पिल्लै, आचार्य पार्वती कुमार आणि सचिन शंकर हे तिघे पुरुष कलाकार असूनही मी त्यांच्यात स्त्रीत्व कधी पाहिले नाही. त्यामुळे सर्वच मुलांमध्ये सरसकट अशी भावना निर्माण होते, असे म्हणता येणार नाही.
भरतनाट्यम् जगभर कसे पोहोचेल?
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कलेतील धर्मनिरपेक्षपणा जपण्याची गरज आहे. जगभरात असंख्य धर्म आहेत. अशा सर्व लोकांकडून आपल्या अस्सल भारतीय कलांना दाद मिळवायची असेल तर, आपल्या कलांचे सादरीकरण, प्रदर्शन करताना त्यामध्ये धर्म कोणत्याही परिस्थितीत डोकवायला नको. कलेचे सादरीकरण करताना त्यामध्ये भारत मात्र निश्चितपणे व्यक्त व्हायला हवा..