वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहत ती बोहल्यावर चढली. सुखी संसाराची मांडणी करायलाही तिने सुरुवात केली. पण विवाहाच्या अवघ्या आठव्या दिवशीच एकतर्फी प्रेमातून तिची भररस्त्यात गळा चिरून हत्या झाली. उष:काल होता होता तिची काळरात्रच उगवली. कथित प्रियकराचे अघोरी प्रेम ठाण्यातील प्रियंका जगताप हिच्या प्राणावर बेतले.ठाण्यात राहणाऱ्या प्रियंका आणि आरोपी दीपक धोधडे यांची गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांशी ओळख होती. प्रियंकाच्या मैत्रिणीने एकदा त्याला मोटारसायकलवरून तिला घरी सोडण्यास सांगितले होते. त्याच ओळखीतून त्यांची मैत्री झाली. या मैत्रीचा गैरअर्थ काढत दीपक तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. त्याची कल्पना येताच प्रियंकाने त्याला दोन हात दूरच ठेवले. मधल्या काळात कल्याण येथे राहणाऱ्या प्रमोद खराडे याच्याशी २८ एप्रिल रोजी तिचे सातारा जिल्ह्यातील दरूज येथे लग्न झाले. दीपकने त्रास देऊ नये म्हणून तिने त्याला आपल्या लग्नाची कल्पनाही दिली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून त्याला तिची काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तो तिच्या घराभोवती घिरट्या घालत असे. त्यात त्याने तिला पतीसोबत पडवळनगर भागात पाहिले आणि तिचे लग्न झाल्याचे त्याला समजले. तिच्या मैत्रिणीमार्फत तिच्याशी संपर्क करण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र तिने त्याला भेटण्यास नकार दिला. ५ मे रोजी दीपकने तिच्याशी संपर्क साधून ‘मला एकदाच आणि शेवटचे भेट, पुन्हा त्रास देणार नाही’, अशी गळ घालत दुसऱ्या दिवशी पासपोर्ट कार्यालयामागे भेटण्यास सांगितले. या प्रकरणावर कायमचा पडदा पाडू, या विचाराने ती त्याला भेटण्यास तयार झाली. तिथे भेट होताच ‘आता माझे लग्न झाले आहे, किमान आता तरी मला त्रास देऊ नकोस’, अशी विनवणी तिने केली. पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस, असेही तिने बजावले तेव्हा आता प्रियंका आपली होणार नाही, हे त्याच्या लक्षात आले. तिला संपविण्याच्या विचाराने तयारीत आलेल्या दीपकने चाकूने तिच्या पोटावर, छातीवर एकूण ११ वार केले. त्यानंतर सर्वात मोठा वार मानेवर करून तिथून पळ काढला. हा वार इतका जोरदार होता की, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत चाकू तिच्या गळ्यात रुतलेल्या अवस्थेतच होता.घटनास्थळाजवळील एका कंपनीच्या सीसीटीव्हीत दीपक आणि प्रियंका दोघे चालत येत असल्याचे चित्रण पोलिसांच्या हाती लागले. शिवाय, लग्नाची बाब एका मैत्रिणीला सांगू नकोस, असे तिने बहीण नम्रताला बजावले होते. सीसीटीव्हीतील चित्रण, बहिणीने व्यक्त केलेला संशय याआधारे पोलिसांनी या प्रकरणाचा अचूक छडा लावल्याचे पोलीस निरीक्षक मदन पाटील यांनी सांगितले.ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा क्र. चार भागात राहणारा दीपक दहावी नापास आहे. तापट स्वभावाचा असल्यामुळे त्याचे आणि आईवडिलांशीही पटत नव्हते. त्यामुळे तो लोकमान्य नगर येथे मावशीकडे वास्तव्याला होता. प्रियंका मात्र उच्चशिक्षित होती. एका जाहिरात कंपनीत ती अकाउंटंटपदी कामाला होती. प्रियंकाला भेटण्याआधी दीपकने आपल्या एका मित्राची मोटारसायकल घेतली होती. ती न मिळाल्याने हा मित्रही मोटारसायकलच्या शोधात पोलीस ठाण्यापर्यंत येऊन पोहोचला. दरम्यान, पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून दीपकने त्याचा मोबाइल खाडीत फेकून दिला होता. खुनानंतर मानपाडा, कल्याण, वाडा, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. अखेर ९ मे रोजी नाहूरच्या एका मॉलमध्ये तो येणार असल्याची माहिती मिळताच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सापळा कचून त्याला अटक केल्याचे वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी सांगितले. तिच्या खुनानंतर आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचे दीपकने पोलिसांना सांगितले. तिच्यावर अघोरी ‘प्रेम’ करण्याऐवजी प्रेमाचा खरा अर्थ जाणून घेतला असता, तर दीपकने कदाचित हे पाऊल उचलले नसते, असे या प्रकरणाचा तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी सांगितले.जितेंद्र कालेकर
उष:काल होता होता काळरात्र आली
By admin | Published: May 26, 2015 10:48 PM