Join us  

रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी; बदलापुरात केमिस्ट्रीतील उच्चशिक्षिताचा कारखाना उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 5:51 AM

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाने केलेल्या कारवाईत आरोपीने तयार केलेल्या एमडी ड्रग्जची विक्रीही केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मुंबई : रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज बनविण्यासाठी करत एका तरुणाने बदलापूरमध्ये कारखाना थाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाने केलेल्या कारवाईत आरोपीने तयार केलेल्या एमडी ड्रग्जची विक्रीही केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या कारवाईत आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ३३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एमडीच्या साठ्यासह एकूण ८२ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर कक्षाच्या पथकाने ११ सप्टेंबरला मानखुर्द येथे कारवाई करत एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्याकडून २१ लाख २० हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. त्यांच्या चौकशीतून एमडी पुरवठा करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. 

असा काढला माग...

एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका आरोपीने बदलापूर-कर्जत

महामार्गाजवळ वांगणी परिसरात ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यातून ड्रग्ज आणल्याची माहिती दिली. त्यानुसार, घाटकोपर कक्षाने कारखान्याचा शोध घेत तेथे छापेमारी केली.

यावेळी २०६ किलोचे विविध प्रकारची रसायने, एक किलो ५८० ग्रॅमची एमडीसदृश पांढऱ्या रंगाची पावडर आणि ६२ ग्रॅमचे एमडी जप्त केले.

टॅग्स :अमली पदार्थ