मॅजिक पेनच्या वापराने दीड लाखांना लुटले
By admin | Published: July 10, 2016 04:04 AM2016-07-10T04:04:30+5:302016-07-10T04:04:30+5:30
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली. मॅजिक पेनच्या वापराने त्यांच्या खात्यातून दीड लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणी
मुंबई : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली. मॅजिक पेनच्या वापराने त्यांच्या खात्यातून दीड लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणी डी.एन. नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
इम्रान रूपानी हे अंधेरीत बकार चाळीत राहतात. खासगी कंपनीत काम करणाऱ्या रूपानी यांच्या बँक खात्यातून २३ जून रोजी १ लाख ४० हजारांची रक्कम समीर पटेल नावाने काढण्यात आली. मात्र, अशा कोणत्याही व्यक्तीला त्यांनी इतक्या मोठ्या रकमेचा धनादेश दिला नसल्याने त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार, त्यांनी बँकेत आणि डी. एन. नगर पोलिसांत तक्रार दाखल केली. रूपानी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना कर्ज हवे होते, ज्यासाठी त्यांनी कर्जासाठी फोन करणाऱ्या सुभाष सिंग नावाच्या व्यक्तीकडे विचारणा केली. तेव्हा त्याने रूपानी यांचे पॅनकार्ड आणि आधारकार्डचे झेरॉक्स आणि आणि एक कॅन्सल्ड धनादेश त्यांच्याकडून घेतला. मात्र, दोन दिवसांनी दिलेला धनादेश बरोबर नसल्याचे सांगून त्याने ते त्यांना परत केले. त्यांच्याकडून नवीन धनादेश घेतला. मात्र, या वेळी धनादेशावर कॅन्सलची रेघ ओढण्यासाठी लुटारूने त्याच्याकडील पेन दिला होता, ज्यावर रूपानी यांची सहीदेखील होती. मात्र, आपण धनादेश कॅन्सल केल्याने निर्धास्तपणे त्यांनी तोच धनादेश सिंगला दिला. त्याच धनादेशाचा वापर करून सिंगने रूपानी यांच्या खात्यातील पैसे काढले. सिंगने त्यांना धनादेश कॅन्सल करण्यासाठी दिलेले पेन ‘मॅजिक पेन’ होते. त्यामुळे त्यांनी धनादेशावर केलेली कॅन्सलची खूण काही वेळाने गायब झाली होती. याचाच फायदा घेत, सिंगने त्यांच्या खात्यातून पैसे काढले. (प्रतिनिधी)