रील बनवण्यासाठी पोलिसांच्या वर्दीचा वापर! उर्फी जावेदविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक
By गौरी टेंबकर | Published: November 3, 2023 10:28 PM2023-11-03T22:28:24+5:302023-11-03T22:28:58+5:30
Urfi Javed: काळ्या रंगाची गाडी थांबते त्यातून दोन महिला पोलीस उतरतात आणि एका रेस्टॉरंटमध्ये असलेल्या उर्फी जावेदला बोलावून 'इतने छोटे छोटे कपडे कोन पहन के घुमता है ? असे विचारत नंतर थेट गाडीत बसवत घेऊन जातात असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - काळ्या रंगाची गाडी थांबते त्यातून दोन महिला पोलीस उतरतात आणि एका रेस्टॉरंटमध्ये असलेल्या उर्फी जावेदला बोलावून 'इतने छोटे छोटे कपडे कोन पहन के घुमता है ? असे विचारत नंतर थेट गाडीत बसवत घेऊन जातात असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेद हिच्यासह चौघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारण ते खरे पोलीस नसून तोतया पोलीस आहेत. त्यानुसार प्रसिद्धीसाठी रील बनवत तिने मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. यात एकाला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले वाहनही हस्तगत केले आहे.
अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात हा व्हिडियो शूट करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नमूद ठिकाणी अभिनेत्री उर्फी जावेद ही दोन महिला व एक पुरुष तसेच इतर संबंधित यांनी पोलिसांच्या गणवेशाचा वापर करत स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्स बनवली आहे. त्यानंतर तो व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. तसेच तिच्या सोबत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन महिला व एका पुरुषाने ते पोलीस नसतानाही फसवणूक करण्याच्या उद्देशाने पोलिसांचा गणवेश परिधान करून ते पोलीस असल्याचे भासवले. या सगळ्या प्रकरणात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे यांच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १७१,४१९,५०० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका तोतया पोलिसाला अटकही करत यासाठी वापरलेले वाहनही हस्तगत करण्यात आले आहे.
...तर मुंबई पोलीस करतात अटक
उर्फीच्या सदर व्हिडिओमुळे एका महिलेला अश्लीलतेसाठी अटक करण्यात आली. यात पोलीस गणवेश तसेच सन्मान चिन्हाचा वापर करण्यात आला. त्यामुळे लोकांना तो खरा वाटला. परिणामी संपूर्ण देशात व जगात महिलांनी अपुरे कपडे घातल्यास मुंबई पोलीस अटक करतात असा संदेश गेला. ज्याने मुंबई पोलिसांची नाहक बदनामी झाली. तेव्हा स्वस्त प्रसिद्धीसाठी कोणीही कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही असा इशाराही मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.