सर्वसामान्यांप्रमाणे सरकारलाही परवानग्यांसाठी होतो त्रास!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:29 AM2019-07-25T03:29:34+5:302019-07-25T03:29:48+5:30
मुख्यमंत्री; मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध कार्यालयांमधून परवानगी मिळविण्यासाठी जसा त्रास होतो तसाच सरकारलाही स्वत:च्या कामांसाठी परवानग्या घेताना शासकीय कार्यालयांकडूनच त्रास होतो, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केली.
मनोरा आमदार निवासाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. विधानभवनात आयोजित कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती निलम गोºहे, उपाध्यक्ष विजय औटी यांचीही भाषणे झाली.
मनोराच्या बांधकाम नकाशाला एमएमआरडीएने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात होता, असे म्हटले जाते. नवीन वास्तूमध्ये आमदार, माजी आमदार, विधानमंडळात येणाऱ्या शिष्टमंडळांची व्यवस्था केली जाईल. तसेच मॅजेस्टिक आमदार निवासाचे पुनर्विकास करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे, आ.राज पुरोहित या वेळी उपस्थित होते.
असे असेल नवे मनोरा
एकूण ३४ मजली टॉवर
७.७४ लाख चौरस फूट बांधकाम
सभागृह आसन क्षमता २४०
वाहनतळ, दवाखाना, बँक, दुकाने, भोजन कक्ष, योगा कक्ष, वाचनालय, छोटे थिएटर व उपहारगृह.
आमदारांसाठी व अभ्यागतांसाठी वेगवेगळे कक्ष