Join us

उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 9:14 PM

संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. त्यातच, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात संताप व्यक्त होत असून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतं. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, आता संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. त्यासोबतच इतर राजकीय पक्ष आणि संघटनांनी राज्यपालांना लक्ष्य केलं आहे. 

संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतो, असे खडे बोल संभाजीराजेंनी सुनावले. त्यानंतर, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेही आक्रमक झाली आहे. शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला असून ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी राज्यपालांची महाराष्ट्राबाहेर हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. आता, संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यावरुनही एकप्रकारे भाजप अन शिंदे गटाला आरसा दाखवला. 

राज्यपालांच्या विधानाचा उल्लेख करत शिंदे गट आणि भाजपा आता कुणाला जोडे मारणार? असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील नेत्यांना सुनावले. तसेच, महाराष्ट्राचे पाणी आणि मऱ्हाठी बाणा दाखवयाची हीच वेळ आहे. ऊठ मराठ्या ऊठ !, असे म्हणत राऊतांनी महाराष्ट्रातील जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 

काय म्हणाले होते राज्यपाल

आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून संभाजीराजेंनी तीव्र शब्दांत भाष्य केले आहे.

राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, छत्रपती संतापले

राज्यपाल असे का बडतात मला माहिती नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या असं मी परवा सुद्धा म्हटलं होते. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील, संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसे शकते. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.  

टॅग्स :संजय राऊतभगत सिंह कोश्यारीमुंबईछत्रपती शिवाजी महाराज