लॉकडाउनचा सदुपयोग :विद्यार्थ्याने घरच्या घरी बनविले स्पेस स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 03:11 AM2020-05-13T03:11:25+5:302020-05-13T03:13:27+5:30
गोरेगाव येथील लक्षधाम हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असलेल्या शिवम सुमित पवार या अकरा वर्षीय विद्यार्थ्याने लॉकडाउनच्या काळात घरच्या घरी स्पेस स्टेशन, मंगलयानाची प्रतिकृती बनविल्या आहेत.
मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. हे लॉकडाउन लागू असतानाच त्याचा सकारात्मक उपयोग केला होता. विज्ञानाची आवड असणारे विद्यार्थी घरबसल्या विज्ञानशी निगडित विविध गोष्टींच्या प्रतिकृती बनवित असून, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गोरेगाव येथील लक्षधाम हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असलेल्या शिवम सुमित पवार या अकरा वर्षीय विद्यार्थ्याने लॉकडाउनच्या काळात घरच्या घरी स्पेस स्टेशन, मंगलयानाची प्रतिकृती बनविल्या आहेत.
लॉकडाउनच्या काळात सर्व चार भिंतींमध्ये बंदिस्त असताना नेहरू सायन्स सेंटर खगोलप्रेमींना घेऊन अवकाशात विहार करत आहे. याच काळात शिवम सुमित पवार याने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, हबल स्पेस टेलिस्कोप, मंगलयान, रॉकेट आदी प्रतिकृती बनवल्या आहेत. नेहरू सायन्स सेंटर, शीतल चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी त्याला मदत केली आहे.
शिवमने वयाच्या सहाव्या वर्षी प्रथम नेहरू सायन्स सेंटर पाहिले. त्यातच दुसरी, तिसरीत असताना खगोलशास्त्रावरील काही पुस्तके त्याच्या वाचनात आली. त्याची खगोलशास्त्रातील रुची वाढली. मे २०१७ मध्ये नेहरू सायन्स सेंटरच्या सायन्स स्पार्कल या तीन दिवसीय शिबिरातही त्याने भाग घेतला होता. वारकरी जसे पंढरीच्या वाºया करतात; त्याप्रमाणे तो वर्षातून तीन ते चार वेळेस नेहरू सायन्स सेंटरला भेट देतो. प्रत्येक वेळी तेथे नावीन्याने भरलेले विविध उपक्रम असतात.