मीरारोड - उत्तन धावगी डोंगरा जवळ स्टेला मारिस रुग्णालयाच्या पाठीमागे असलेली हातभट्टी उत्तन सागरी पोलिसांनी उद्धवस्त करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत . धक्कादायक बाब म्हणजे सदर गावठी दारू बनवण्यासाठी मानवी शरीरास घातक असे युरिया खत वापरले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
कायद्याने बंदी असून देखील उत्तन पोलीस ठाणे हद्दीत गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्ट्या व दारूचे गुत्ते चालत असल्याने नागरिकां मध्ये धडक कारवाईची गरज नेहमी व्यक्त होत असते . पोलीस देखील हातभट्ट्या आणि गुत्त्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करत असतात . परंतु आरोपी पुन्हा दारू विक्री सुरु करतात . काही ठिकाणी तर घरातूनच गुत्ते चालवले जातात.
स्टेला मॉरिस रुग्णालयाच्या मागील पडीक निर्जन भागात हातभट्टी चालवली जात असल्याची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश निकम व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली . त्याठिकाणी ६ निळ्या रंगाचे ३०० लिटरचे प्लॅस्टिकचे बॅरल (टाक्या), प्रत्येकी १ जर्मन पातेले लोखंडी बॅरल, गॅस शेगडी, एच. पी. कंपनीचा गॅस बाटला, ५ किलो युरिया खत, १५ किलो काळा गूळ, आणि एक सफेद गावठी दारू भरलेले कॅन असे एकूण १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला . सदर हातभट्टी चालक डेल्सटन विंसन ग्रेसियस (३२) व मार्शल किसन पाटील (२९) या दोघा दारू माफियांना मुंबई दारूबंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे .