उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार, राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला प्रकल्प आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:37 IST2025-01-17T10:37:20+5:302025-01-17T10:37:33+5:30
राज्य सरकारची मान्यता मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार, राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला प्रकल्प आराखडा
मुंबई : दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. या ५५ किमी लांबीच्या मार्गासाठी तब्बल ८७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्य सरकारची मान्यता मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
सागरी सेतू थेट मुंबई -दिल्ली एक्स्प्रेस वेबरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना थेट दक्षिण मुंबईत पोहोचता येईल. एमएमआरडीएचा जपानच्या जायका वित्तीय संस्थेकडून कर्ज उभारण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यावर परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची मंजुरी घेण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नरिमन पॉइंट-विरार १ तासात
मरीन ड्राईव्ह ते विरार अशा सागरी मार्गांच्या उभारणीचा मानस आहे. त्यातील पालिकेने मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला केला.
वांद्रे वरळी सी लिंक वापरात आहे. एमएसआरडीसीकडून वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे.
त्यापुढे पालिकेने वर्सोवा ते भाईंदर असा कोस्टल रोड उभारण्याचे काम हाती घेतले आहे. उत्तन ते विरार सागरी मार्गामुळे नरिमन पॉइंट ते विरार येथे पोहचण्यासाठी एक तास लागेल.
...म्हणून घेतला निर्णय
एमएमआरडीएकडून वर्सोवा ते विरारदरम्यान समुद्रातून ४२ किमीचा सेतू उभारण्यात येणार होता. मात्र, पालिकेकडूनही वर्सोवा ते भाईंदरदरम्यान कोस्टल रोड उभारण्यात येत असल्याने एकाच भागात दोन रस्ते होतील. त्यामुळे एमएमआरडीएने उत्तन ते विरार सेतू उभारण्याचा निर्णय घेतला.
कोठून सुरू होणार - पालिकेचा वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड संपतो त्या भाईंदर येथील सुभाष चंद्र मैदानापासून सुरू होणार.
शेवट कोठे होणार - विरारला बापणे येथे हा सागरी सेतू जमिनीवर उतरणार. तेथून दिल्ली-मुंबई हायवेला विरार कनेक्टरद्वारे जोडणी दिली जाणार.
प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाची एकूण लांबी ५५ किमी
सागरी सेतू २४ किमी
उत्तन कनेक्टर १० किमी
वसई कनेक्टर २.५ किमी
विरार कनेक्टर १९ किमी