मुंबई - देशातील 5 राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणुका लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने शिवसेना आणि राष्ट्रवादी संबंधित राज्यांतील प्रादेशिक पक्षांशी बोलणी करत आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देऊ केली होती. मात्र, आता ती जागा परत घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीचा अपमान केल्याचे म्हटले आहे. सपाने शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात, असे खोचक ट्विट भातखळकर यांनी केले आहे. या ट्विटला भातखळकर यांनी एक मीडियाचे ट्विट रिशेअर करत त्यातील वृत्ताचा दाखला दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातल्या पक्षांनी उत्तर प्रदेशात युतीचा निर्णय घेतल आहे. त्यासंदर्भात, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांबाबत खुलासा केला होता. “अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार आहेत” आम्ही सर्व नेते उत्तर प्रदेशात जाणार आहोत, असं पटेल यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात जाणार असल्याचं यापूर्वीच सांगितलं आहे.