Join us

सत्ता मिळाल्यावरही आम्ही विरोधीपक्षात असल्यासारखे वागतो - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 1:42 PM

विचारांशी कटिबद्धता ठेवण्यापेक्षा सत्ता येणा-या पक्षामध्ये जाण्याचे प्रमाण वाढतेय. विचारांशी प्रामाणिक न रहाता सत्ता असलेल्या पक्षामध्ये जाणे लोकशाहीसाठी योग्य नाही.

ठळक मुद्देअनेकवर्ष विरोधीपक्षात काढल्यानंतर सत्तेत गेल्यानंतरही काहीजण विरोधीपक्षात असल्यासारखे वागतात.दिलीप वळसे-पाटील यांनी राजकारण, समाजकारण, दुग्ध विकास क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

मुंबई : सत्ता मिळाल्यानंतरही काही जण विरोधकांसारखे वागतात आणि विरोधात गेल्यावरही सत्ताधा-यांसारखे वागतात, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी लगावला. त्यांच्या विधानाने व्यासपीठावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही हसू आवरता आले नाही.दिवाकर रावते येथे आहेत म्हणून मी हे बोलत नाही. आमच्या पक्षाचेही अनेक आमदार, मंत्री अजूनही विरोधात असल्यासारखे वागतात. त्यांना आंदोलने, मोर्चे यांची एवढी सवय झाली आहे की सत्ताही पचत नाही, असेही ते म्हणाले. माजी विधानसभाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात गडकरी म्हणाले, की वयस्क नेत्यांनी राजकारणातून लवकर निवृत्त व्हायला हवे. नवीन लोकांना संधी द्यायला हवी. तुम्ही कधी बाजूला होता, असे विचारण्याची वेळ आणू नये. हल्ली कोणीही, कुठेही, कधीही जातो. मात्र दिलीप वळसे यांनी पक्ष आणि नेतृत्वावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही, असेही त्यांनी बोलून दाखविले.मुख्यमंत्री म्हणाले, दिलीपरावांना मी शाल दिली, गडकरींनी पुष्पगुच्छ तर शरद पवारांनी त्यांच्या हाती महाराष्ट्र (नकाशाची प्रतिकृती) दिला आहे. आता त्यांची नवी इनिंग सुरू होत आहे. वळसे पाटील विधानसभाध्यक्ष होते, तेव्हा एकनाथ खडसे आक्रमकपणे बोलायचे. ते सांगतील तोच नियम असायचा, असेही ते गंमतीने म्हणाले. त्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही खडसे यांना सर्वाधिक न्याय दिलीप वळसे पाटील यांनीच दिला, असे विधान हसतच केले. हल्ली पक्ष सोडून कुठेही जाणे सोपे झाले आहे, असे म्हणत चव्हाण यांनी पॉज घेतला. त्यांचा इशारा नारायण राणे यांच्या दिशेने असावा. पण मुख्यमंत्र्यांनीही त्याला दाद दिली.अनेक नेत्यांची हजेरीवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केली.शांत, संयमी व्यक्तिमत्व - पवारएक काळ होता ज्यावेळी ६० आमदार पक्षाची साथ सोडून गेले होते. हे संपूर्ण पुन्हा उभे करायचे ठरविले आणि राज्यव्यापी दौरा आखला. त्याचे सर्व नियोजन हे दिलीप वळसे पाटील यांनी केले होते. शांत व संयमीपणासाठी वळसे पाटील ओळखले जातात, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला.साहेबांमुळेच घडलो- वळसे-पाटीलशरद पवार साहेबांनी मला राजकारणात संधी दिली, त्यातून समाजकारण करता आले. मी आज जो काही आहे, तो साहेबांमुळेच, अशा शब्दांत वळसे पाटील यांनी ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.

टॅग्स :नितीन गडकरी