मुंबई कोळी समाजाचीच, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू; योगी आदित्यनाथ यांचं आश्वासन
By मनोहर कुंभेजकर | Published: September 20, 2022 05:27 PM2022-09-20T17:27:52+5:302022-09-20T17:33:04+5:30
राष्ट्रीय मच्छिमार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी ह्याना नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची लखनौ येथे भेट घेतली.
मुंबई- नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन (एनएफएफ) या मच्छिमार संघटनेचे राष्ट्रीय मच्छिमार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी ह्याना नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची लखनौ येथे भेट घेतली.
समुद्रातील आणि नदी- तलावातील मासेमारीकरीता होणारा त्रास, वाढता खर्च, रोजगार निर्मिती आणि समाजाला राष्ट्रीय भागीदारी अश्या सर्वच विषयांवर देशभरातील मच्छिमारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी उत्तर प्रदेशचे मस्त्योद्योग मंत्री आणि एनएफएफबसंस्थेचे सदस्य डॉ.संजय निषाद उपस्थित होते.
कोळी समाजाची मायभूमी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई बद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की,मुंबई कोळी समाजाचीच आहे मुंबईकडे लक्ष द्या आणि परत मिळवा. आगामी पालिका निवडणुकीत मुंबईला भ्रष्टाचारापासून वाचवण्यासाठी आणि कोळी समाजाचा विकास करण्यासाठी आम्ही कोळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ. भानजी यांनी सांगितले की, मच्छीमार समाजाला स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात कोणत्याही पक्षाने एकही आमदारकीची अथवा खासदारकीची जागा मुंबई आणि महाराष्ट्रात दिलेली नाही त्यामुळे कोळी समाजाचे जटिल प्रश्न कधीच सुटलेले नाही. भारतीय जनता पक्षाने आता एक कोटी सतरा लाख कोळी समाजाच्या जनतेचा विचार करून समाजाला न्याय द्यावा असे चर्चेदरम्यान सुचित केले. समाजाची उन्नती आणि प्रगती होऊन राष्ट्रीय प्रवाहात हा समाज येऊ शकतो अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. कोळी समाजाच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे अश्वासन मुख्यमंत्री योगी यांनी दिले.मच्छिमारांवरील त्यांचे प्रेम आणि आपलेपणा पाहून आम्ही भारावून गेलो असून मुंबईला येण्याचे त्यांना डॉ.भानजी यांनी आमंत्रण दिले.