भगव्या कपड्यांतला सीईओ अन् मुंबईचे प्रदूषण
By अतुल कुलकर्णी | Published: January 9, 2023 07:17 AM2023-01-09T07:17:13+5:302023-01-09T07:19:40+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांच्या मुंबई दाैऱ्यात आपल्या राज्यात पाच लाख कोटींची गुंतवणूक खेचून नेली.
- अतुल कुलकर्णी
नवीन वर्षाचा पहिला आठवडा तीन गोष्टींमुळे चर्चेत राहिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा, मुंबईचे होत असलेले गॅस चेंबर आणि उर्फी-चित्रा वाघ प्रकरणावरून निर्माण झालेले राजकीय प्रदूषण.
चित्रा वाघ या भाजपच्या सध्याच्या फायर ब्रॅण्ड नेत्या आहेत. कोणताही विषय हाती घेतला की, अत्यंत आक्रमकपणे भूमिका घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. उर्फी जावेद नावाच्या मुलीने (तिला अभिनेत्री तरी का म्हणावे, कारण तिचा ना कुठला सिनेमा आला ना, कुठली सिरिअल.) कसले कपडे घातले म्हणून चित्रा वाघ तिच्यावर तुटून पडल्या. उर्फीने असे कपडे पहिल्यांदाच घातलेले नाहीत.गेले कित्येक महिने असेच चित्रविचित्र पोषाख करून स्वतःच्या देहाचे ती प्रदर्शन करत आली आहे. सोशल मीडियावर आंबट शौकीन ते बघतात, त्यावर कॉमेंट्स करतात. आपल्याकडे कोणते कपडे घालावेत, कसे घालावे, याविषयी कुठलेही नियम नाहीत. कोणी काय घालावे, कोणी काय खावे, हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे चित्रा वाघ यांनी कोणता विषय पक्षीय पातळीवरून मांडावा, हे त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे स्वातंत्र्य आहे. मात्र यामुळे मुंबईकरांना आणि मीडियाला एखाद्या सिनेमाची असावी, अशी स्टोरी ऐकायला, पाहायला मिळाली. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली.
राजकीय वातावरण ढवळून निघाले. ज्या लोकांना उर्फी नावाची ही बाई कोण आहे? हे माहिती नाही अशांनीही सोशल मीडियात जाऊन तिचे फोटो पाहून घेतले. अनेकांनी चित्रा वाघ यांना यानिमित्ताने सल्ले दिले. तुम्ही असे केले पाहिजे.. तसे केले पाहिजे.., असेही सांगून झाले. काहींनी संजय राठोड प्रकरणाचे पुढे काय झाले, अशी विचारणा केली. कोणीतरी भाजपच्याच व्यासपीठावर एक मुलगी अश्लील नृत्य करतानाचा व्हिडीओ ट्वीट केला.याच दरम्यान अजित पवार यांचे छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयीचे विधान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ करणे, असे काही साइड सीन्स या मुख्य सिनेमाच्या कथानकाला जोडून आले. अर्थातच माध्यमांचे लक्ष या सगळ्या बातम्यांकडे गेले. लोकांनाही असे चमचमीत विषय चर्चेला हवे असतातच.
हे सगळे घडत असताना मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले. त्यांनी मुकेश अंबानी यांच्यापासून सगळ्या टॉपच्या उद्योगपतींची वन- टू-वन भेट घेतली. त्यांच्यासोबत गुंतवणुकीची चर्चा केली. चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शकांसोबत उत्तर प्रदेशात अतिभव्य फिल्म सिटी उभी करण्याविषयी बैठक घेतली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर परत जाताना त्यांनी उत्तर प्रदेशात पाच लाख कोटींची गुंतवणूक खेचून नेली. त्यावर सत्ताधारी पक्षातून कोणी काही बोलणे अपेक्षित नव्हतेच. मात्र विरोधकांनीदेखील एवढी मोठी गुंतवणूक उत्तर प्रदेशात होत असताना, महाराष्ट्रात तुम्ही काय करत आहात, असा प्रश्न सरकारला विचारण्याचे धाडस दाखवले नाही.
एवढी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात राहणारे उद्योजक, उत्तर प्रदेशात करतात. नवनवे प्रकल्प उत्तर प्रदेशात कशा पद्धतीने आणले जातील, यावर चर्चा करतात. मात्र महाराष्ट्रात एकाही नेत्याला याविषयी ना दुःख झाले, ना खेद वाटला..! तसे वाटले असते तर एका तरी नेत्याने पोटतिडकीने महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेकारांसाठी तुम्ही काय करत आहात, असा प्रश्न विचारला असता. महाराष्ट्रात काही भागात उद्योजकांना उद्योग करणे जिकिरीचे झाले आहे. कामगारांच्या काही टोळ्या विनाकाम करता आम्हाला पैसे द्या, असे म्हणून कारखानदारांना ब्लॅकमेल करत असल्याच्या तक्रारी आहेत. एमआयडीसीचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे याच्या रोज नवनव्या सुरस कथा बाहेर येत आहेत. भय्या लोकांनी महाराष्ट्रात येऊन हातपाय पसरले. मात्र एमआयडीसीतदेखील भय्यासाहेबांच्या भय्यागिरीची लागण झाल्याचे आता लोक उघडपणे बोलत आहेत. त्यावर कोणाला काही भाष्य करावेसे वाटत नाही.
योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा योग आला तेव्हा भगव्या कपड्यांतला सीईओ पाहायला मिळाला. स्वच्छ आणि स्पष्टपणे बोलणे, आपण काय केले आहे, हे ठामपणे सांगणे आणि भविष्यात काय करायचे आहे याविषयी ठोस विधाने करणे, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये दिसून आली. कोणताही कागद हातात न धरता स्वतःच्या राज्याची सगळी माहिती ते खाडखाड सांगत होते. कशा पद्धतीने पोलिस यंत्रणा आपण हाताळली. उत्तर प्रदेशातील महिलांविषयीची गुन्हेगारी कशी आटोक्यात आणली, हे त्यांच्या तोंडून ऐकणे ही एक मेजवानी होती. मुंबई अर्थ की नगरी है, उत्तर प्रदेश धर्म की नगरी है... असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला विकासाचा धर्म पाळायचा आहे हे सांगितले.
अनेक प्रकल्पांची माहिती दिली. ते जे काही सांगत होते, त्याचे वास्तव उत्तर प्रदेशात जाऊन तपासणे हा वेगळा भाग आहे. मात्र आपल्या राज्याचे ब्रॅण्डिंग दुसऱ्या राज्यात जाऊन ठामपणे करणे आणि त्या बदल्यात पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन जाणे ही सोपी गोष्ट नाही.
आपल्या महाराष्ट्रातले नेते मात्र, अजित पवार काय बोलले..? कोणाचा कसा अपमान झाला..? उर्फीने कोणते कपडे घालावे..? याच विषयात दंग राहिले. महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे म्हटले जाते. मात्र हे फक्त आता वाचण्यापुरतेच शिल्लक राहील की काय, अशी परिस्थिती आपलेच नेते आपल्या हाताने तयार करत आहेत. नव्या वर्षाची ही सुरुवात आहे.