योगी आदित्यनाथांचा रिमोटही शरद पवारांकडे?; मनसेनं व्हायरल केलेल्या फोटोमुळे 'कुजबूज'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:23 AM2022-05-25T11:23:28+5:302022-05-25T11:45:26+5:30
राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शांत बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी आपल्या पोतडीतून राज आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांचे पवारांसोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करीत प्रत्युत्तर दिले.
१. योगींचा रिमोटही पवारांकडे?
अयोध्या दौऱ्याला विरोधासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप राज ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता केला. परंतु, यामुळे उलट टीका सहन करावी लागल्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी ब्रिजभूषण सिंह यांचे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतचे फोटो शेअर करून डाव पलटवण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शांत बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी आपल्या पोतडीतून राज आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांचे पवारांसोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करीत प्रत्युत्तर दिले. योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या पक्ष शिस्तीला न जुमानता एखादा खासदार पवारांच्या सांगण्यामुळे इतके मोठे पाऊल उचलतो, हे न समजण्याजोगे आहे. याचा अर्थ योगी सरकारचा रिमोटही पवारांकडे आहे, असा काढायचा का? अशा चर्चा दिवसभर कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात होत्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत अयोद्धा दौऱ्यावर स्पष्टीकरण देताना नाव न घेता रसद महाराष्ट्रातून पुरवल्याचे सांगितले होते. तेव्हापासून अनेक चर्चांना उधाण आले. राजकीय विश्लेषकांनी तर्कही लावले. मात्र काेणाचाच अंदाज अचूक ठरला नाही. अखेर मनसेने शरद पवार यांचा फोटो वायरल केल्यानंतर पुन्हा राजकीय घमासान सुरू झाले. यात शरद पवार नावाची पॉवर किती आहे, याची कुजबुज मात्र सुरू झाली.
२. आरटीओतील दलालांचे काय?
नवी मुंबईत जागोजागी उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांचा विषय सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट नवी मुंबई वाहतूक पोलिसांची गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. या अवजड वाहनांना जितके वाहतूक पोलीस जबाबदार आहेत, तितकेच आरटीओ आणि नवी मुंबई महापालिकाही जबाबदार आहे.
महापालिकेचे विभाग अधिकारी रस्तोरस्ती उभ्या असणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करीत असून, आरटीओचाही त्याकडे कानाडोळा आहे. दोन्ही कार्यालयांत काही ठराविक दलाल असून, ते कसे सक्रिय आहेत? हे वाशीचे एपीएमसी मार्केट आणि एमआयडीसी परिसरात जागाेजागी दिसते. एपीएमसीत तर आरटीओ कार्यालयाबाहेरच अवजड वाहनांनी बेशिस्तीच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या असून, नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील ‘ठाणेकरां’शी हातमिळवणी करून वाहनचालकांचा जो छळ सुरू आहे, त्यावर कोण आळा घालणार, असा प्रश्न करण्यात येत आहे.